Jasprit Bumrah: दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. पण दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलदाजांनी कडवी झुंज दिली. भारतीय संघाने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला होता. पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी फॉलोऑन टाळून भारतीय संघावर आघाडी घेतली.
या सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला, त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ ९७ धावांनी पिछाडीवर होता. पण पहिल्या सत्रात जॉन कॅम्पबेल आणि शे होप यांनी मिळून १५० हून अधिक धावांची भागीदारी केली. दोघांनी शतकं झळकावत वेस्ट इंडिजला सामन्यात पुनरागमन करून दिलं. वेस्ट इंडिजवर पुन्हा एकदा एका डावाने सामना गमावण्याचं संकट ओढावलं होतं. पण या जोडीने पिछाडी भरून काढली आणि भारतीय संघावर आघाडी घेतली. पण ही जोडी फुटल्यानंतर इतर फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत वेस्ट इंडिजच्या एका पाठोपाठ एक फलंदाजांना माघारी धाडलं.
बुमराहच्या भन्नाट चेंडूवर जोमेल वॉरिकनची दांडी गुल
तर झाले असे की, वेस्ट इंडिजचा दुसरा डाव सुरू असताना भारतीय संघाकडून ९५ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. त्यावेळी जोमेल वॉरिकन स्ट्राईकवर होता. या षटकातील दुसराच चेंडू बुमराहने ऑफ स्टम्पच्या लाईनवर टाकला. जो टप्पा पडताच अँगलने आत आला आणि जोमेल वॉरिकनची दांडी गुल करून गेला. चेंडूला स्टम्पला धडकताच स्टम्प उडून लांब पडला. त्यामुळे जोमेल वॉरिकनला अवघ्या ३ धावांवर माघारी परतावं लागलं.
भारतीय संघाने पहिल्या डावात उभारला ५१८ धावांचा डोंगर
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सलामीला आलेल्या केएल राहुलने ३८ धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने १७५ धावा केल्या. साई सुदर्शन ८७ धावांवर माघारी परतला. तर गिलने नाबाद १२९ धावांची खेळी केली. नितीश कुमार रेड्डीने ४३ आणि ध्रुव जुरेलने ४४ धावांची खेळी केली. भारतीय संघाने पहिला डाव ५ गडी बाद ५१८ धावांवर घोषित केला.