Yashasvi Jaiswal Wicket: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू आहे. पहिल्या सामन्यात एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केलं. भारताने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला होता. पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पिछाडी भरून काढली आणि भारतीय संघासमोर विजयासाठी १२१ धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. दरम्यान जैस्वाल बाद होताच सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालची जोडी मैदानावर आली. धावांचा पाठलाग करताना जैस्वालने पहिल्याच षटकात खणखणीत चौकार मारला. त्यानंतर त्याने आणखी एक चौकार मारला. २ चौकार मारल्यानंतर त्याने आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. या नादात सीमारेषेवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्यामुळे पहिल्या डावात १७५ धावांची खेळी करणारा जैस्वाल दुसऱ्या डावात अवघ्या ८ धावांवर माघारी परतला.
सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
या सामन्यातील पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने १७५ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ब्रायन लाराची भेट घेतली होती. त्यावेळी ब्रायन लारा त्याला म्हणाले होते की, आमच्या गोलंदाजांना जास्त मारू नकोस. आता जैस्वाल स्वस्तात बाद झाल्यानंतर जैस्वाल आणि लारा यांच्या फोटोचे मीम्स बनवून व्हायरल केले जात आहेत.
भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर
या सामन्यातील पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या २४८ धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजला फॉलोऑन मिळाल्याने पुन्हा एकदा फलंदाजीला यावं लागलं. वेस्ट इंडिजने ही पिछाडी भरून काढली आणि ३९० धावा केल्या. वेस्ट इंडिजने भारतीय संघासमोर विजयासाठी १२१ धावांचे आव्हान ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने १ गडी बाद ६३ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला हा सामना आणि मालिका जिंकण्यासाठी अजूनही ५८ धावांची गरज आहे. केएल राहुल २५ तर साई सुदर्शन ३० धावांवर नाबाद आहेत.