Yashasvi Jaiswal Record In WTC: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वालच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने वेगाने धावा करत आपलं शतक पूर्ण केलं. यासह त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये झळकावलं सातवं शतक

वेस्टइंडिजविरूद्ध झळकावलेलं हे शतक यशस्वी जैस्वालच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक ठरले आहे. त्याने १६ चौकार मारून १४५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. कसोटी क्रिकेटमध्येही आपल्या आक्रमक फटकेबाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या जैस्वालने या डावात फलंदाजी करताना एकही षटकार खेचलेला नाही. जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक देखील वेस्टइंडिजविरूद्ध खेळताना झळकावलं होतं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा पराक्रम

यशस्वी जैस्वालचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील सातवे शतक ठरले आहे. यासह भारतासाठी सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने ऋषभ पंत केएल राहुलला मागे टाकलं आहे. ऋषभ आणि केएल राहुलच्या नावे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ७ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर या यादीत रोहित शर्मा आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल अव्वल स्थानी आहे. दोघांनी या स्पर्धेत फलंदाजी करताना प्रत्येकी ९-९ शतकं झळकावली आहेत. आता ७ शतकांसह यशस्वी जैस्वाल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय फलंदाज

रोहित शर्मा-९

शुबमन गिल- ९

यशस्वी जैस्वाल- ७

ऋषभ पंत- ७

केएल राहुल- ६

भारतीय संघाची दमदार सुरूवात

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना सलामीला आलेल्या केएल राहुलने ३८ धावांची खेळी केली. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शनने मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. दोघांनी दुसऱ्या सत्राच्या समाप्तीपर्यंत १ गडी बाद २२० धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल १११ धावांवर नाबाद आहे. तर साई सुदर्शन ७१ धावांवर नाबाद आहे.