भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळी ८.१२ वाजता निधन झाले. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडल्यानंतर रोहित संघात पुनरागमन करत आहे. रोहित आता भारतीय संघाचा पूर्णवेळ कप्तान आहे.
हेही वाचा – कॅन्सरशी झुंज संपली…! स्टार क्रिकेटर सुरेश रैनाच्या वडिलांचं निधन
लता मंगेशकर गेल्या अनेक दशकांपासून सर्वांच्या आवडत्या आहेत आणि नेहमीच राहतील. लता मंगेशकर यांची जागा देशात कोणीच घेऊ शकणार नाही, असे सतत म्हटले जाते. लता मंगेशकर यांना क्रिकेटची आवड होती. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या त्या फॅन होत्या.
दिग्गज गायिका लता मंगेशकर या जवळपास महिनाभरापासून आजारी होत्या. ८ जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच क्रँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे. लतादीदींनी लहान वयातच त्यांच्या आवाजाने आणि सुराने गायनात प्रभुत्व मिळवले होते आणि विविध भाषांमध्ये गाणी गायली होती. लता मंगेशकर यांनी ३६ भाषांमधील ५० हजाराहून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. गायन क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल लता मंगेशकर यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.