India vs West Indies 2nd Test, Shubman Gill Press Conference: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला १० ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय कर्णधार शुबमन गिलची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत गिलला साई सुदर्शनबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. दरम्यान शुबमन गिलने त्याला समर्थन करणार असल्याचं म्हटलं आहे.

आयपीएल स्पर्धेत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या साई सुदर्शनला इंग्लंड दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र तो कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडू शकलेला नाही. पण गिलने स्पष्ट केलं आहे की, त्याला तिसऱ्या क्रमांकावर भरपूर संधी दिली जाईल. दुसऱ्या कसोटी सामन्याआधी कर्णधार गिल साई सुदर्शनला नेट्समध्ये थ्रो डाऊन करताना दिसून आला. युवा खेळाडूंना पुरेसा वेळ देणं खूप गरजेचं असल्याचंही गिलने सांगितलं.

काय म्हणाला शुबमन गिल?

पत्रकार परिषदेत बोलताना शुबमन गिल म्हणाला, “युवा खेळाडू प्रत्येक सामन्यात शतक झळकावू शकत नाही. आधी आम्हाला त्याला संधी द्यावी लागेल त्यानंतर आम्ही विचार करू की, त्याला आणखी काय सुधारणा करण्याची गरज आहे. सध्या तरी आम्ही त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची पुरेशी संधी देणार आहोत.”

आयपीएल स्पर्धेत साई सुदर्शन हा शुबमन गिलचा ओपनिंग पार्टनर आहे. दोघांनी मिळून गुजरात टायटन्स संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवलं होतं. आयपीएल २०२५ सर्धेत तो ऑरेंज कॅपचा मानकरी देखील ठरला होता. ही कामगिरी पाहता त्याची पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात निवड झाली होती. त्याला आतापर्यंत भारतासाठी ४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. ४ सामन्यातील ७ डावात फलंदाजी करताना २१ च्या सरासरीने १४७ धावा केल्या आहेत. इंग्लंड दौऱ्यावर त्याला केवळ १ अर्धशतकी खेळी करता आली होती. करूण नायरला संघाबाहेर करून साई सुदर्शनला संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान साई सुदर्शन दमदार खेळी करून सर्वांची बोलती बंद करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.