IND vs WI 1st Test Updates in marathi: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला कसोटी आज २ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या सामन्यासह गिल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर पहिल्यांदाचं संघाचं नेतृत्त्व करत आहे. पण १५ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघामध्ये मोठा बदल दिसत आहे.
वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटी सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया घरच्या मैदानावर गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करत आहे. या सामन्याासाठी भारतीय संघ ३ फिरकीपटू २ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थिती ध्रुव जुरेलकडे यष्टीरक्षकाची भूमिका आहे.
शुभमन गिल पहिल्यांदाच घरच्या मैदानावर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करत असल्याने हा सामना भारतीय क्रिकेटसाठी एका नवीन युगाची सुरुवात आहे. २५ वर्षीय गिलने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या मालिकेत प्रभावी कामगिरी केली. यानंतर आता घरच्या मैदानावर या नवख्या संघाचा कसा निभाव लागणार, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. याचबरोबर टीम इंडिया ३ दिग्गजांशिवाय पहिल्यांदाच मैदानात उतरत आहे.
भारतीय संघ १५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या तीन दिग्गजांशिवाय कसोटी सामना खेळण्यासाठी उतरला आहे. विराट आणि अश्विन दोघांनीही २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तर रोहितला २०१३ मध्ये कसोटी कॅप मिळाली होती.
अश्विनने नोव्हेंबर २०११ मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केलं होतं. तेव्हापासून डिसेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देण्यापूर्वी भारतात खेळलेल्या टीम इंडियाच्या अखेरच्या कसोटी सामन्यापर्यंत अश्विन सर्व सामने खेळला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घरच्या मैदानावर मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध अश्विन अखेरचा कसोटी सामना खेळला होता.
भारताने रोहित-विराट-अश्विनशिवाय घरच्या मैदानावर २०१० मध्ये नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. हा सामना तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने १-० च्या फरकाने एक डाव आणि १९८ धावांनी विजय मिळवला होता.
अश्विनने घरच्या मैदानावर झालेल्या ६५ कसोटी सामन्यांमध्ये २१.५७ च्या सरासरीने ३८३ विकेट्स घेतल्या. त्याने १९८९ धावाही केल्या, ज्यात चार शतकं आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. अश्विनच्या अनुपस्थितीत अष्टपैलू खेळाडू म्हणून वॉशिंग्टन सुंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तर अश्विनच्या जागी कुलदीप यादवला संघात सर्वाधिक संधी मिळू शकते.