Sunil Gavaskar on Virat Kohli and Rohit Sharma: क्वीन्स पार्क ओव्हल येथे वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील दुसरी कसोटी सोमवारी पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पावसाने आणलेल्या व्यत्ययाने अनिर्णित राहिली. डॉमिनिका येथील पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता. त्या विजयाच्या जोरावर टीम इंडियाने मालिका १-०ने जिंकली. कॅरेबियन भूमीवर भारताचा हा सलग ९वा मालिका विजय ठरला. गेल्या २१ वर्षांत या संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध येथे एकही कसोटी गमावलेली नाही. मात्र, लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी त्यानंतर वरिष्ठ फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवडीमागील हेतू आणि मालिकेत दोघांच्या धावा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
गावसकर यांनी मिड डेच्या कॉलममध्ये तरुणांपेक्षा मोठ्या नावांना (वरिष्ठ खेळाडूंना) अधिक पाठिंबा मिळाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. “तरुण खेळाडूंनी मोठ्या खेळाडूंना आव्हान द्यावे असे निवडकर्त्यांना वाटत नाही का?”, असा परखड सवाल त्यांनी केला. निवड समितीचे नवे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यपद्धतीत बदल होईल का? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर गावसकर टीम इंडियावर सतत टीका करत आहेत.
युवा खेळाडूंनी प्रयत्न करणे चांगले नाही का?-गावसकर
सुनील गावसकर यांनी मिड डेच्या त्यांच्या कॉलममध्ये लिहिले आहे की, “वेस्ट इंडिजच्या या दुबळ्या आक्रमणाविरुद्ध रोहित आणि कोहलीच्या धावा काही प्रश्न निर्माण करतात, निवडकर्त्यांनी यातून काय शिकले जे त्यांना आधीच माहित नव्हते?” काही युवा खेळाडूंना आजमावून पाहणे आणि ते कसोटी क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतात यावर योग्य तो निर्णय घेणे. युवा खेळाडूंनी मोठ्या नावांसमोर कोणत्याही प्रकारचे आव्हान निर्माण करावे असे निवडकर्त्यांना वाटत नाही.” असा संतप्त सवाल त्यांनी बीसीसीआय निवड समितीला केला आहे.
लिटिल मास्टर पुढे म्हणाले की, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वेस्ट इंडीजसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध धावा केल्याचा काय उपयोग? जे विश्वचषकात सुद्धा पात्र होऊ शकले नाहीत अशा संघाविरुद्ध तुम्ही धावा करून निवड समितीला काय सांगू इच्छित आहात?” रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या या कसोटी मालिकेत निःसंशयपणे शानदार कामगिरी केले आहे, परंतु चाहत्यांना हे माहीत आहे की, ही काही मोठी उपलब्धी नाही. असो, वेस्ट इंडिज सध्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. अलीकडच्या काळात त्यांनी अनेक छोट्या संघांविरुद्ध सामने गमावले आहेत. हे पहिल्यांदाच घडत आहे जेव्हा वेस्ट इंडिजला वर्ल्ड कपमध्येही स्थान मिळवता आले नाही. या मालिकेत विराट कोहलीने आपले ७६वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.
अजित आगरकर आल्यानंतर बदल होणार का?
माजी कर्णधार सुनील गावसकर पुढे म्हणाले, “आता अजित आगरकर निवड समितीचे अध्यक्ष झाले आहेत, बघूया भविष्यासाठी संघ बांधणीच्या दृष्टिकोनात काही बदल होतो का? नाहीतर तीच जुनी कहाणी चालू राहील.” गावसकर यांनी यापूर्वी रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर निराशा व्यक्त केली होती. याबरोबरच त्यांनी राहुल द्रविडसह कोचिंग स्टाफवर WTC पराभवाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती.