Smriti Mandhana Records Against Australia: आगामी आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडलीय. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघातील अनुभवी फलंदाज स्मृती मान्धनाने विक्रमांचा पाऊस पाडला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ थोडक्यात कमी पडला. पण स्मृती मान्धनाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय महिला संघासाठी अतिशय महत्वाचं आणि आत्मविश्वासात भर घालणारं आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करून मालिका १-१ ने बरोबरीत आणली. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना निर्णायक होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर विजयासाठी ४१३ धावांचा डोंगर सर करण्याचं आव्हान ठेवलं. हा सामना भारतीय संघाला अवघ्या ४३ धावांनी गमवावा लागला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. अशी सुरुवात स्मृती मान्धनाने करून दिली. तिने ६३ चेंडूत १२५ धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान तिने १७ चौकार आणि ५ षटकार खेचले.
एकाच डावात मोडून काढले ५ मोठे विक्रम
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जाईल तेव्हा स्मृती मान्धनाने साकारलेल्या खेळीचा देखील आवर्जून उल्लेख केला जाईल. या खेळीदरम्यान तिने ५ मोठे विक्रम मोडून काढले. या सामन्यात तिने २३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह ती भारतीय महिला संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारी महिला क्रिकेटपटू ठरली. तिने ५० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यासह ती भारतीय संघासाठी सर्वात वेगवान शतक झळकावणारी फलंदाज ठरली.
हे तिच्या वनडे कारकिर्दीतील १३ वे शतक ठरले. यासह ती महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारी संयुक्तरित्या दुसरी फलंदाज ठरली. यासह ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरूद सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला. आणखी एक सर्वात मोठा विक्रम म्हणजे ती महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारी सलामीवीर फलंदाज ठरली आहे.