Team India Wearing Pink Jersey: ऑस्ट्रेलियाचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. आगामी वर्ल्डकप २०२५ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं आणि मालिका १-१ ने बरोबरीत आणली. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना हा दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघातील खेळाडू गुलाबी रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरले आहेत. काय आहे यामागचं नेमकं कारण? जाणून घ्या.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात गुलाबी रंगाची जर्सी घालून खेळण्यामागचं कारण खूप खास आहे. लोकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी बीसीसीआयकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरसह इतर खेळाडू गुलाबी जर्सीत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत त्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे. बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, “ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी भारतीय खेळाडू गुलाबी रंगाची जर्सी घालून खेळणार आहे.

दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघासमोर विजयासाठी मोठं आव्हान उभारण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा सामना जिंकून भारतीय महिला संघाकडे इतिहासाला गवसणी घालण्याची संधी असणार आहे. याआधी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकही द्विपक्षीय मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रतिका रावल, स्म्रिती मंधाना, हरलीन देओल,दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक),राधा यादव,क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, स्नेह राणा.

ऑस्ट्रेलिया- एलिसा हेली (यष्टीरक्षक/कर्णधार), जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, बेथ मुनी, ग्रेस हॅरिस, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅक्ग्राथ,किम गार्थ, मेगन शूट, जॉर्जिया वेअरहॅम, अॅलाना किंग.