Team India Named Unwanted Record: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे. वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. पण पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबोत खेळवले जाणार आहेत. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. दरम्यान भारतीय संघाचा संपूर्ण डाव २४७ धावांवर आटोपला. भारताची शेवटची फलंदाज बाद होताच टीम इंडियाच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
या सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारताकडून सलामीला आलेल्या फलंदाजांनी ४८ धावांची सलामी दिली. प्रतिका रावलने ३१ धावा केल्या,तर स्म्रिती मांधना २३ धावांवर माघारी परतली. भारतीय संघाला हवी तशी सुरूवात मिळाली नव्हती. त्यानंतर हरलिन देओलने हातभार लावत ४६ धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरदेखील या सामन्यात फार काही करू शकली नाही. ती अवघ्या १९ धाव करत माघारी परतली. जेमिमा रॉड्रिग्ज ३२, दिप्ति शर्मा २५, स्नेह राना २०, ऋचा घोष ३५ धावांवर माघारी परतली. भारतीय संघाचा पहिला डाव २४७ धावांवर आटोपला.
भारतीय संघाला ज्या पद्धतीने सुरूवात मिळाली होती. ते पाहता, २४७ धावा फार कमी नाही. पण सर्व फलंदाज बाद झाल्यामुळे भारतीय संघाच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. भारतीय संघ पाकिस्तानविरूद्ध खेळताना पहिल्यांदाच ऑलआऊट झाला आहे. याआधी असं कधीच घडलेलं नाही. भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ १२ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारताचा पहिल्यांदाच ऑलआऊट झाला.
पुरुष क्रिकेट संघांप्रमाणे महिलांच्या संघांनी देखील हस्तांदोलन करणं टाळलं. या सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना डायना बेगने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर सादिया इक्बाल, कर्णधार फातिमा सनाने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर रमीन शमीम आणि नशरा संधूने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. भारतीय संघाचा डाव ५० षटकात २४७ धावांवर आटोपला.