लखनऊ : डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारच्या (५/९३) प्रभावी माऱ्यामुळे भारत ‘अ’ संघाला दुसऱ्या अनौपचारिक कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्याच दिवशी, मंगळवारी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचे नऊ फलंदाज माघारी धाडता आले. मात्र, ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघानेही चारहून अधिक धावगतीने खेळताना दिवसअखेर ३५० धावांची मजल मारली होती.
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणाऱ्या ध्रुव जुरेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रसिध कृष्णाने सुरुवातीलाच कॅम्पबेल कॅलवे (९) याला माघारी धाडले. यानंतर सॅम कोन्सटास (९१ चेंडूंत ४९) आणि कर्णधार नेथन मॅकस्वीनी (१६२ चेंडूंत ७४) यांनी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा डाव सावरला. या दोघांनी ८६ धावांची भागीदारी रचली. परंतु गेल्या सामन्यातील शतकवीर कोन्सटासचे अर्धशतक एका धावेने हुकले. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. यानंतर सुथारने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना एकाच षटकात ऑलिव्हर पिके (२९) आणि कूपर कॉनली (०) यांचा अडसर दूर केला.
वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने मॅकस्वीनीला बाद केल्यानंतर जोश फिलिपे (३३ चेंडूंत ३९) आणि जॅक एडवर्ड्स (७८ चेंडूंत ८८) यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी केली. फिलिपेला सुथारने, तर एडवर्ड्सला गुरनूरने बाद केले. मग सुथारने विल सदरलँड (१०) आणि कोरी रॉकिचोलीला (१०) माघारी धाडत पाच बळी पूर्ण केले. दिवसअखेर टॉड मर्फी (नाबाद २९) आणि हेन्री थॉर्टन (नाबाद १०) खेळपट्टीवर होते.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ‘अ’ (पहिला डाव) : ८४ षटकांत ९ बाद ३५० (जॅक एडवर्ड्स ८८, नेथन मॅकस्वीनी ७४, सॅम कोन्सटास ४९; मानव सुथार ५/९३, गुरनूर ब्रार २/७१, प्रसिध कृष्णा १/७३, मोहम्मद सिराज १/७३)
कसोटीपटूंचा सहभाग
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंनी ‘अ’ संघांतील दुसरा अनौपचारिक सामना खेळण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि नितीश रेड्डी हे कसोटीपटू या सामन्यात खेळत आहेत. तसेच प्रसिध कृष्णा आणि साई सुदर्शन या कसोटी संघाचा भाग असलेल्या खेळाडूंनी सलग दुसऱ्या सामन्यात सहभाग नोंदवला आहे. भारत-विंडीज कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होईल.