IND A beat AUS A by 5 Wickets and Creates History: भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघांमध्ये दोन सामन्यांची अनऑफिशियल कसोटी मालिका खेळवली गेली. भारताने १-० अशा फरकाने मालिकेत विजय नोंदवला आहे. भारताच्या अ संघाने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. भारताकडून या सामन्यात केएल राहुल आणि साई सुदर्शन यांनी शतकं झळकावली.

ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ४१२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ५ विकेट्स गमावत हे लक्ष्य सहज गाठलं. भारताकडून केएल राहुलने १७६ धावांची खेळी केली. तर साई सुदर्शननेही शतक झळकावलं. याशिवाय कर्णधार ध्रुव जुरेलने ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध चौथ्या डावात ४१२ धावांचं लक्ष्य गाठलं, जे अ संघांच्या सामन्यातील इतिहासांमधील यशस्वीरित्या गाठलेलं सर्वात मोठं लक्ष्य आहे. इतर कोणत्याही देशाच्या अ संघाने कधीही ४०० पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य गाठले नव्हतं, परंतु आता भारत अ संघाने ही कामगिरी केली आहे.

भारत अ संघाने ४१२ धावांचा जलद पाठलाग करून ऑस्ट्रेलिया अ संघाला मागे टाकलं. ऑस्ट्रेलियाने २०२२ मध्ये हंबनटोटा येथे श्रीलंका अ संघाविरुद्ध ३६७ धावांचा पाठलाग केला होता. परदेशातील भूमीवर हा एक जागतिक विक्रम आहे. भारत अ संघाने यापूर्वी २००३ मध्ये नॉटिंगहॅमशायरविरुद्ध ३४० धावांचे लक्ष्य गाठले होते.

भारताच्या विजयात केएल राहुल आणि साई सुदर्शन यांचं मोठं योगदान आहे. केएल राहुलला ताप असतानाही तो संघासाठी या सामन्यात खेळला. भारताच्या दुसऱ्या डावात केएल राहुल ७५ धावांची खेळी करत रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला. यानंतर साई सुदर्शनने भारताचा डाव सावरला. तर संघाला गरज असताना राहुल अखेरच्या दिवशी पुन्हा फलंदाजीला उतरला आणि भारताला विजय मिळवून देत माघारी परतला.

केएल राहुलने यादरम्यान ८३.८१ च्या स्ट्राईक रेटने १६ चौकार आणि ४ षटकारांसह १७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीसाठी राहुल सामनावीर ठरला. तर साई सुदर्शनने ९ चौकार आणि एका षटकारासह १०० धावांची खेळी केली. ध्रुव जुरेलनेही ६६ चेंडूत ५६ धावा केल्या. भारत अ संघाला विजय मिळवून देणारे हे तिघेही खेळाडू आता २ ऑक्टोबरपासून टीम इंडियाकडून खेळताना दिसतील. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.