दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका आजपासून; विक्रमी विजयाचा भारताचा निर्धार
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी नव्या-जुन्या खेळाडूंची चाचपणी भारताकडून केली जाणार आहे. भारतीय संघ गुरुवारी सलग १३ ट्वेन्टी-२० सामन्यांत विजयाचा विक्रम नोंदवण्यासाठी उत्सुक आहे. परंतु दुखापतीमुळे केएल राहुलने संपूर्ण मालिकेतून माघार घेतल्याने यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघबांधणी करण्याचा उद्देश मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पक्का केला आहे. गेल्या काही महिन्यांत त्वेषाने कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही सर्वोत्तम संधी भारताला मिळेल. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे केएल राहुलकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. परंतु मालिकेच्या पूर्वसंध्येला राहुलने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे उपकर्णधार पंतकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कुलदीप यादवलाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.२०१०नंतर आफ्रिकेने भारतातील कोणतीही मर्यादित षटकांची मालिका गमावलेली नाही. गतवर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर प्रथमच आफ्रिकेचा संघ एकत्रित खेळत आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने तेसुद्धा गांभीर्याने पाहात आहेत.

ऋतुराज-इशान सलामीला
राहुलच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन भारताच्या डावाला प्रारंभ करतील. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादवऐवजी संघात स्थान मिळवणाऱ्या श्रेयस अय्यरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करीत छाप पाडली होती; पण याच क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्सच्या दीपक हुडाने सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे. कठीण प्रसंगात तारणारा पंत आणि धडाकेबाज दिनेश कार्तिक यांच्यामुळे मधली फळी सक्षम झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुसाठी विजयवीराची भूमिका बजावणारा कार्तिक या मालिकेतसुद्धा आपल्या फलंदाजीनिशी आगामी विश्वचषकासाठी दावेदारी करू शकेल. ‘आयपीएल’मध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा गुजरात टायटन्सच्या विजयाचा शिल्पकार हार्दिक पंडय़ा हा आणखी एक विजयवीर मधल्या फळीत असेल.

आवेशला संधी?
तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या जागेसाठी आवेश खानला संधी मिळू शकते. मात्र तो अपयशी ठरल्यास ‘आयपीएल’मध्ये आपल्या यॉर्कर चेंडूंनी लक्ष वेधणाऱ्या अर्शदीप सिंगला संघात स्थान दिले जाईल. तेजतर्रार मारा करणारा उमरान मलिक हा आणखी एक पर्याय असला तरी त्याला प्रतीक्षा करावी लागू शकते, असे द्रविडने स्पष्ट केले आहे. यजुर्वेद्र चहल भारताच्या फिरकीची धुरा सांभाळेल. या दोघांनीही यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सुरेख कामगिरी केली आहे. रवींद्र जडेजा दुखापतीतून सावरल्यानंतर विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात नक्की स्थान मिळवू शकेल. त्यामुळे चहल, रवी बिश्नोई, अक्षर पटेल यांच्यात कमालीची स्पर्धा निर्माण होणार आहे.

मिलरवर भिस्त
‘आयपीएल’मध्ये गुजरातच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या डेव्हिड मिलरकडून आफ्रिकेच्या फलंदाजीच्या महत्त्वाच्या आशा आहेत. याशिवाय क्विंटन डीकॉक आणि एडीन मार्करमसारखे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याची भिस्त कॅगिसो रबाडा आणि आनरिख नॉर्कीए यांच्यावर असेल, तर तबरेझ शम्सी आणि केशव महाराज यांच्यावर फिरकीची मदार असेल.

भारत : ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्शल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिका : टेंबा बव्हुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), रीजा हेन्रिक्स, हेन्रिच क्लासीन, केशव महाराज, एडीन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्कीए, वेन पार्नेल, ड्वेन प्रीटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्ज, रॅसी व्हॅन डर दुसेन, मार्को जॅन्सन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’ वेळ : सायं. ७ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदूी (एचडी वाहिन्यांसह)