मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बहुप्रतीक्षित मालिकेतील पहिला सामना पर्थला होण्याची शक्यता आहे. तर, उर्वरित सामने ॲडलेड, ब्रिस्बन, मेलबर्न व सिडनी येथे खेळविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या ठिकाणांची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही.

ॲडलेड येथे दुसरी कसोटी तर, ब्रिस्बन येथे तिसरी कसोटी खेळवण्यात येईल. ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना नेहमीप्रमाणे मेलबर्न येथे होईल. तर, नवीन वर्षात दोन्ही संघ सिडनी येथे अखेरची कसोटी खेळतील. तसेच,ॲडलेड येथे होणारा दुसरा सामना दिवस-रात्र असण्याची शक्यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून अजूनही आगामी हंगामाचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. मात्र, या महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरुवात होऊ शकते.

हेही वाचा >>>अन् तिने चेहरा लपवून केला पर्दाफाश, आरोग्य केंद्रातील दूरवस्थेची महिला IAS अधिकाऱ्याकडून झाडाझडती!

१९९१-९२ नंतर प्रथमच भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यापूर्वी, १९९१-९२ मध्ये भारतीय संघाला ४-० असे पराभूत व्हावे लागले होते. २०१८-१९ व २०२०-२१ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता व दोन्ही वेळेला भारताने मालिकेत विजय नोंदवला होता. २०१८-१९ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पर्थमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला गेला होता व ऑस्ट्रेलियाने हा सामना १४६ धावांनी जिंकला होता. या दोन्ही देशांमध्ये २०२०-२१ मध्ये झालेल्या मालिकेत पश्चिम ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेने पर्थ येथे सामन्याचे आयोजन न झाल्याने नाराजी व्यक्त केली होती.