आज बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या सामन्यात आघाडीच्या फळीवर नजर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय, मीरपूर : पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारताच्या आघाडीच्या फळीवर दडपण असून बुधवारी होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यांचा खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल. तसेच पहिला सामना गमावल्यामुळे भारताला या सामन्यात विजय अनिवार्य आहे.

पहिल्या सामन्यात बांगलादेशने आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या गडय़ासाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी रचून विजय नोंदवला होता. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला, पण बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांना बाद करताना त्यांना अडचणी आल्या. मात्र, गोलंदाजांमुळे भारताला किमान झुंज देता आली; परंतु भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी पूर्णपणे निराशा केली. केएल राहुलचा अपवाद वगळता इतर भारतीय फलंदाज अपयशी ठरले.

भारताने २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरची द्विदेशीय मालिका खेळली होती. त्या वेळी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारताला तीन सामन्यांच्या मालिकेत १-२ अशी हार पत्करवी लागली होती. यंदाही पहिला सामना गमावल्यामुळे भारतीय संघावर दडपण आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशचे फिरकी गोलंदाज शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. त्यांनी दुसऱ्या सामन्यातही अशीच कामगिरी केल्यास भारताला पुनरागमन करणे अवघड होईल.

इशान, त्रिपाठीला संधी?

या मालिकेसाठी सॅमसनची निवड करण्यात आली नाही आणि आपल्या गेल्या एकदिवसीय सामन्यात ९३ धावांची खेळी करणारा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात अंतिम एकादशमध्ये स्थान मिळाले नाही. भारताकडे रजत पाटीदार आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांचाही पर्याय आहे. मात्र, त्यांना संधी मिळेल का याबाबत स्पष्टता नाही. भारताने पहिल्या सामन्यात केवळ पाच फलंदाज खेळवले होते. यात बदल झाल्यास किशन, त्रिपाठी आणि पाटीदार यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळू शकेल.

रोहित, विराट, धवनकडून अपेक्षा

गेल्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या राहुलने ७० चेंडूंत ७३ धावांची खेळी केली. मात्र, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन यांसारख्या अनुभवी फलंदाजांनी निराशा केली. त्यांनी कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे. मीरपूरची खेळपट्टी फलंदाजीसाठी फारशी अनुकूल नसली, तरीही भारताकडून १८६हून अधिक धावा अपेक्षित होत्या. या मालिकेसाठी शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांसारख्या युवा खेळाडूंना विश्रांती देण्याचा निवड समितीचा निर्णय आश्चर्यकारक होता. एकदिवसीय विश्वचषकाला आता १० महिनेच शिल्लक असून भारतीय संघाचा दृष्टिकोन अजूनही स्पष्ट झालेला नाही. भारताचे आघाडीचे फलंदाज सुरुवातीला बरेच चेंडू निर्धाव खेळत असल्याचे दिसत आहे. गेल्या सामन्यात भारताच्या ४२ षटकांच्या डावात जवळपास २५ षटकांमध्ये फलंदाजांना एकही धाव काढता आली नव्हती. यात सुधारणा आवश्यक आहे.

संघ

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार/यष्टिरक्षक), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाझ अहमद, अक्षर पटेल, दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन, शार्दूल ठाकूर, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार
  • बांगलादेश : लिटन दास (कर्णधार), अनामुल हक बिजॉय, शाकिब अल हसन, मुशफिकूर रहीम, अफिफ हुसेन, यासिर अली चौधरी, मेहदी हसन मिराज, मुस्तफिझूर रहमान, हसन महमूद, इबादत हुसेन चौधरी, नासुम अहमद, महमदुल्ला, नजमूल हुसेन शांटो, काझी नुरुल हसन सोहन, शोरफूल इस्लाम
  • वेळ : सकाळी ११.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन ३, टेन ५
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India bangladesh odi series india must win rohit sharma ysh
First published on: 07-12-2022 at 00:02 IST