१०-२ अशी मात; रुपिंदर पाल सिंगचे सहा गोल

आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पध्रेच्या जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पहिल्याच सामन्यात जपानचा १०-२ असा धुव्वा उडवला. पेनल्टी कॉर्नरतज्ज्ञ रुपिंदर पाल सिंगने सहा गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला रमणदीप सिंग (२), तलविंदर सिंग (१) आणि आफन युसूफ (१) यांनी तुल्यबळ साथ दिली. तत्पूर्वी सलामीच्या लढतीत गतविजेत्या पाकिस्तानला यजमान मलेशियाकडून २-४ असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झालेल्या या स्पध्रेत भारताने २०११ साली जेतेपद पटकावले होते. त्यानंतर पाकिस्तानने (२०१२ व २०१३) सलग दोन वष्रे बाजी मारली. त्यामुळे पाच वर्षांनंतर भारत पुन्हा अजिंक्यपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय खेळाडूंनी जपानच्या बचावपटूंना अचंबित करताना पहिल्या १५ मिनिटांत ४-० अशी आघाडी घेतली. रमणदीप (२ व १५ मि.) आणि रुपिंदर (९ व १२ मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल केले.

दुसऱ्या सत्रातही भारताची ही घोडदौड कायम राहिली. रुपिंदरने १७ व्या मिनिटाला गोल करून आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. दोन मिनिटांत तलविंदर सिंगने मैदानी गोल करून भारताला ६-० असे आघाडीवर आणले. २२ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदरने पुन्हा गोल केला. ०-७ अशा पिछाडीवर असलेल्या जपानला केंटा तनका (२३ मि.) आणि हिरोमासा ओचियाई (३८ मि.) यांच्या गोलने दिलासा मिळाला, परंतु पराभवाच्या वेदना टाळण्यासाठी तो पुरेसा नव्हता. रुपिंदरचा गोलधमाका चौथ्या सत्रातही कायम राहिला व त्याने आपल्या खात्यात आणखी दोन गोलची भर टाकली. ५० व्या मिनिटाला युसूफने गोल करून भारताची गोलदशमी पूर्ण केली.