पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात; सूर्यकुमारचे अर्धशतक

जयपूर : सूर्यकुमार यादव (४० चेंडूंत ६२ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (३६ चेंडूंत ४८) या मुंबईकरांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून मात केली. याचप्रमाणे रोहित आणि राहुल द्रविड या कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाचाही विजयी प्रारंभ झाला.

जयपूर येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठत तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार रोहित आणि के. एल. राहुल (१५) यांनी पाच षटकांतच भारताचे अर्धशतक फलकावर लावले. मिचेल सँटनरने राहुलला बाद करत भारताला पहिला झटका दिला. रोहितला मग सूर्यकुमारची उत्तम साथ लाभली. त्यांनी ५९ धावांची भागीदारी रचल्यावर ट्रेंट बोल्टने रोहितला माघारी पाठवले. सूर्यकुमारने फटकेबाजी सुरु ठेवत ३४ चेंडूंत अर्धशतक झळकावले. मात्र, स्वीप मारण्याचा प्रयत्न करताना बोल्टने त्याचा त्रिफळा उडवला. सूर्यकुमारच्या ६२ धावांच्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तो बाद झाल्यावर ऋषभ पंतने (नाबाद १७) महत्वाचे योगदान देत भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६४ अशी धावसंख्या उभारली. भुवनेश्वर कुमारने डॅरेल मिचेलला (०) पहिल्याच षटकात बाद केल्यावर अनुभवी मार्टिन गप्टिल (४२ चेंडूंत ७०) आणि मार्क चॅपमन (५० चेंडूंत ६३) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १०९ धावांची भागीदारी रचल्यावर चॅपमनचा फिरकीपटू अश्विनने त्रिफळा उडवला. गप्टिलने मात्र मोठे फटके खेळल्याने न्यूझीलंडला १६० धावांचा टप्पा पार करता आला.

करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन

जयपूर : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी स्टेडियममध्ये हजर राहणारे प्रेक्षक आणि बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस मुखपट्टीविना आढळले. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतात झालेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हटले जात आहे. जयपूरमधील या सामन्यात प्रेक्षकसंख्येबाबत कोणतेही बंधन घालण्यात आले नव्हते. सवाई मानसिंग स्टेडियमवर प्रेक्षकांना पूर्ण लसीकरण किंवा करोना चाचणी अहवाल हे नियम तिकीटसाठी बंधनकारक होते. आठ वर्षांच्या अंतराने या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना झाल्याने क्रिकेटरसिकांचे औत्सुक्य शिगेला पोहोचले होते. परंतु अध्र्याहून अधिक प्रेक्षक मुखपट्टीविना सामन्याचा आनंद लुटत होते. या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता २५ हजार इतकी आहे. परंतु प्रत्यक्षात अध्र्याहून कमी तिकीटविक्री झाल्याची माहिती मिळाली आहे.

जेमिसनला ट्वेन्टी-२० मालिकेत विश्रांती 

जयपूर : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनप्रमाणेच वेगवान गोलंदाज कायले जेमिसनला भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. कसोटी क्रिकेटला प्राधान्य देत ट्वेन्टी-२० मालिकेत काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती मिळणार असल्याचे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : २० षटकांत ६ बाद १६४ (मार्टिन गप्टिल ७०, मार्क चॅपमन ६३; रविचंद्रन अश्विन २/२३, भुवनेश्वर कुमार २/२४)  पराभूत वि. भारत : १९.४ षटकांत ५ बाद १६६ (सूर्यकुमार यादव ६२, रोहित शर्मा ४८; ट्रेंट बोल्ट २/३१)

’  सामनावीर : सूर्यकुमार यादव