India Equals World Record in Test History: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरूद्धचा आपला विक्रम कायम ठेवत कसोटी मालिका २-०च्या फरकाने आपल्या नावे केली आहे. भारताच्या निर्भेळ मालिका विजयासह संघाने विश्वविक्रमाची बरोबरी करत मोठी कामगिरी नोंदवली आहे. दिल्ली कसोटीत भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडिया मोठ्या विजयाच्या जवळ होती, पण वेस्ट इंडिजने कमालीची झुंज दिली, पण भारताने अखेर विजय मिळवला.

वेस्ट इंडिज संघाविरूद्ध विजयासह टीम इंडियाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी केली आहे, जी यापूर्वी फक्त एकदाच घडली आहे. यासह भारताने जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चक्रातील भारताने चौथा कसोटी सामना जिंकला आहे. यासह संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पहिली कसोटी मालिका जिंकली आहे. भारताने गिलच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड दौऱ्यावरही चांगली कामगिरी केली होती, पण ती कसोटी मालिका अनिर्णित राहिली. २००२ पासून टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. हा एक मोठा विक्रम आहे.

एका संघाविरूद्ध सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाने आपल्या नावे केला आहे. यापूर्वी एका संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. १९९८ ते २०२५ पर्यंत दक्षिण आफ्रिकेने सलग १० मालिकांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला. तर भारताने आता सलग १० कसोटी मालिकांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करून दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पण यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरूद्ध दोन सामने गमावले आहेत. तर भारताने एकही सामना न गमावता मालिका आपल्या नावे केली आहे.

२००२ पासून भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही कसोटी सामना गमावलेला नाही. भारताने १७ सामने जिंकल्या तर १० कसोटी सामने अनिर्णित राहिले. एखाद्या संघाविरुद्ध कसोटीत भारताचा हा सर्वात मोठा विक्रम आहे.

एका संघाविरुद्ध सर्वाधिक सलग कसोटी मालिका विजय

१० – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (२००२-२५) *
१० – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (१९९८-२४)
९ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज (२०००-२२)
८ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (१९८९-२००३)
८ – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे (१९९६-२०)