भारत आणि इंग्लंड याच्यात सुरू असलेली तीन सामन्यांची टी २० मालिकेतील शेवटचा सामना काल (१० जुलै) झाला. या सामन्यात भारताचा १७ धावांनी पराभव झाला. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघात चार बदल करण्यात आले. इन फॉर्म असलेल्या हार्दिक पंड्याला खाली बसवले मात्र, विराट कोहलीला खेळवण्यात आले. विराट कालच्या सामन्यातही अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. याबाबत कर्णधार रोहित शर्माला विचारले असता, त्याने कोहलीच्या टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीची पाठराखण केली आहे. रोहित म्हणाला, “बाहेरचे लोक काय म्हणतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. त्याच्यावर टीका करणारे तज्ज्ञ कोण आहेत हे मला माहित नाही. त्यांना तज्ज्ञ का म्हणतात हे देखील मला समजत नाही.”

पुढे तो असेही म्हणाला, “ते फक्त बाहेरून बघत आहेत. खेळामध्ये आणि संघामध्ये काय चालले आहे ते त्यांना कळत नाही. आम्ही एक संघ बनवत आहोत, आमची एक विशिष्ट विचारप्रक्रिया आहे. त्यामागे खूप विचारमंथन केलेले आहे. हो खेळाडूंना पाठीशी घातले जाते. त्यांना संधी दिली जाते. बाहेरच्या लोकांना हे काहीही माहिती नाही. त्यामुळे बाहेर काय चाललंय हे महत्त्वाचं नाही.”

हेही वाचा – विम्बल्डनवारी करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या मुलीचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही झाले फॅन; ट्वीट करून केले कौतुक

रोहित शर्माने खेळाडूंच्या फॉर्मबद्दल देखील आपले मत मांडले. तो म्हणाला, “जर फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर तो वर-खाली होतच असतो. पण, यामुळे खेळाडूची गुणवत्ता कधीच घसरत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूवर विशिष्ट टिप्पणी करता तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. असाच प्रकार माझ्यासोबतही घडला आहे. इतरांसोबतही हेच होते. जर एखादा खेळाडू प्रदीर्घ काळासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि तोच वाईट फॉर्मशी झुंज देत आहे तर त्याच्याबाबत वाईट बोलणे चुकीचे आहे. परंतु, जे संघ सांभाळत आहेत त्यांना त्या गुणवत्तेचे महत्त्व माहित आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या दोन वर्षांपासून खराब फॉर्मशी झगडत आहे. माजी कर्णधार कपिल देव, अजय जडेजा यांसारख्या खेळाडूंनीदेखील त्याच्यावर टीका केली आहे. विराट कोहली चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असूनही त्याला संघात स्थान दिले जात आहे, यावरून संघ व्यवस्थापनावरदेखील टीका होत आहे.