आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची (आयओए) १४ महिन्यांच्या वनवासानंतर बंदीवासातून सुटका केल्यानंतर पाच दिवसांनी सोची हिवाळी ऑलिम्पिक क्रीडानगरीतील एका विशेष कार्यक्रमात रविवारी भारताचा तिरंगा डौलाने फडकला.
माऊंटन व्हिलेज भागातील इंटरनॅशनल प्लाझा या ठिकाणी झालेला हा कार्यक्रम ४५ मिनिटे चालला आणि हिवाळी ऑलिम्पिक स्पध्रेत सहभागी झालेले भारताचे तिन्ही स्पर्धक यावेळी हजर होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्यासह आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिवा केशवन, हिमांशू ठाकूर आणि नदीम इक्बाल आणि त्यांचे तीन प्रशिक्षक यांनी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला हजेरी लावली. भारताच्या राष्ट्रगीताच्या सुरावटीवर तिरंगा फडकवण्यात आला.
भारतीय हिवाळी क्रीडा स्पर्धा महासंघाचे सचिव रोशनलाल ठाकूर यांनी सांगितले की, ‘‘आयओसीच्या बंदीमुळे जेव्हा स्पध्रेला सुरुवात झाली तेव्हा तिरंगा फडकावण्यास परवानगी नव्हती. याचप्रमाणे भारत ही अक्षरे लिहिलेला गणवेश परिधान करता येत नव्हता. परंतु बंदी उठवण्यात आल्यामुळे आता गर्वाने आम्ही राष्ट्रध्वज फडकावू शकतो.
याचप्रमाणे भारत अक्षर लिहिलेले गणवेश घालू शकतो.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आयओएचे अध्यक्ष रामचंद्रन यांच्यासह आम्ही सहा जण एका रांगेत उभे होतो. प्रथम आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा आणि त्यानंतर भारताचा झेंडा फडकवण्यात आला.’’
रामचंद्रन म्हणाले की, ‘‘हा अभिमास्पद क्षण आहे. मी भूतकाळाकडे पाहात नाही, परंतु भविष्यकाळ नक्की साद घालत आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2014 रोजी प्रकाशित
अखेर सोची ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकला!
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची (आयओए) १४ महिन्यांच्या वनवासानंतर बंदीवासातून सुटका केल्यानंतर
First published on: 17-02-2014 at 03:06 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India complete return to olympic with sochi flag raising