अतिरिक्त अष्टपैलू खेळविण्यासाठी पहिल्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत संघाबाहेर ठेवण्यात आलेल्या अर्शदीप सिंगने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. अर्शदीपचा (३/३५) प्रभावी मारा, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने (२३ चेंडूंत नाबाद ४९) केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात रविवारी ऑस्ट्रेलियावर पाच गडी आणि नऊ चेंडू राखून विजय मिळवला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली.

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सलग १५ सामन्यांत नाणेफेक गमावण्याची मालिका अखेर खंडित केली. त्याने नाणेफेक जिंकताना होबार्ट येथील बेलरिव्ह ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ बाद १८६ अशी धावसंख्या उभारली. मग भारताने १८.३ षटकांत ५ बाद १८८ धावा करत विजय साकारला. भारताने या सामन्यासाठी संघात तीन बदल केले. अर्शदीप, वॉशिंग्टन, जितेश शर्मा (१३ चेंडूंत नाबाद २२) यांना संधी मिळाली आणि तिघांनीही संधीचे सोने करताना भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारतीय संघ आक्रमक शैलीतच खेळणार असल्याचे कर्णधार सूर्यकुमार आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट केले आहे. याचाच प्रत्यय होबार्ट येथील सामन्यात आला. भारताच्या अभिषेक शर्मा (१६ चेंडूंत २५), शुभमन गिल (१२ चेंडूंत १५) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (११ चेंडूंत २४) या अव्वल तीन फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. मात्र, त्यांनी छोटेखानी खेळीदरम्यानही गोलंदाजांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर अक्षर पटेलला (१२ चेंडूंत १७) फारसे योगदान देता आले नाही, परंतु तिलक वर्मा (२६ चेंडूंत २९) आणि वॉशिंग्टन यांनी तीन षटकांत ३४ धावा जोडत भारताला सुस्थितीत नेले. मग वॉशिंग्टन आणि जितेश यांनी २५ चेंडूंत ४३ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताला विजयी केले. डावखुऱ्या वॉशिंग्टनने तीन चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. भारताला तीन धावांची आवश्यकता असताना जितेशने चौकार मारल्याने वॉशिंग्टन अर्धशतकापासून वंचिता राहिला.

त्याआधी, डावखुऱ्या अर्शदीपने अप्रतिम स्विंग गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांची कसोटी पाहिली. त्याने आपल्या पहिल्या दोन षटकांत अनुक्रमे ट्रॅव्हिस हेड (६) आणि जोश इंग्लिस (१) यांचा अडसर दूर केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची २ बाद १४ अशी स्थिती झाली. यानंतर तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टीम डेव्हिडने (३८ चेंडूंत ७४) भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने आठ चौकार आणि पाच षटकार मारताना ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर घातली. दुसऱ्या बाजूने कर्णधार मिचेल मार्श (११) आणि मिचेल मार्श (०) यांना सलग दोन चेंडूंवर वरुण चक्रवर्तीने बाद केले. पाठोपाठ शिवम दुबेच्या गोलंदाजीवर डेव्हिड माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र, मार्कस स्टोइनिस (३९ चेंडूंत ६४) आणि मॅथ्यू शॉर्ट (१५ चेंडूंत नाबाद २६) यांनी झुंजार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १८५ धावांचा टप्पा ओलांडून दिला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ६ बाद १८६ (टीम डेव्हिड ७४, मार्कस स्टोइनिस ६४, मॅथ्यू शॉर्ट नाबाद २६; अर्शदीप सिंग ३/३५, वरुण चक्रवर्ती २/३३, शिवम दुबे १/४३) पराभूत वि. भारत : १८.३ षटकांत ५ बाद १८८ (वॉशिंग्टन सुंदर नाबाद ४९, तिलक वर्मा २९, अभिषेक शर्मा २५; नेथन एलिस ३/३६, मार्कस स्टोइनिस १/२२)

भारताने १८७ धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठले. ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोणत्याही संघाने केलेली ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. विशेष म्हणजे, याआधीचे दोन विक्रमही भारताच्याच नावे आहेत. भारतीय संघाने २०१६ मध्ये सिडनीत १९८ धावा, तर २०२० मध्ये सिडनीतच १९५ धावांचे आव्हान पार केले होते.