आज पोलंडविरुद्ध अखेरचा साखळी सामना

 इपोह (मलेशिया) : जपान, मलेशिया आणि कॅनडाचा धुव्वा उडवत भारतीय हॉकी संघाने अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रवेश आधीच निश्चित केला आहे. आता साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत पोलंडवर दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीसाठी सज्ज होण्याची भारतीय संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.

चार सामन्यांत तीन विजय आणि एक सामना बरोबरीत सोडवत भारताने सहा देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत १० गुणांनिशी अव्वल स्थान प्राप्त केले आहे. भारत आणि दक्षिण कोरिया यांचे प्रत्येकी १० गुण झाले असले तरी दोन्ही संघांमध्ये आठ गोलचा फरक आहे. हेच दोन्ही संघ शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडतील.

जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय हॉकी संघासाठी २१व्या क्रमांकावरील पोलंडचा पेपर अगदी सोपा असणार आहे. एका सामन्याचा अपवाद वगळता भारताची या स्पर्धेतील कामगिरी अप्रतिम झाली आहे. मनदीप सिंगने कॅनडाविरुद्धच्या सामन्यात शानदार हॅट्ट्रिक झळकावली असली तरी त्याला अन्य आघाडीवीरांकडून चांगली साथ अपेक्षित आहे. मनदीप आणि वरुण कुमार यांनी पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करताना लक्षवेधी कामगिरी बजावली असून, त्यांच्याकडून पुढील सामन्यांतही पुनरावृत्ती अपेक्षित आहे.

भारताने पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले असले तरी त्यांना २०१० मध्ये अखेरच्या जेतेपदावर नाव कोरता आले आहे. त्यामुळे आठ वर्षांपासूनचा जेतेपदांचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान भारतीय हॉकी संघासमोर असेल.

शिवेंद्र सिंग साहाय्यक प्रशिक्षकपदी?

नवी दिल्ली : माजी आघाडीवीर शिवेंद्र सिंग याची भारतीय हॉकी संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी निवड होणार असून पुढील महिन्यापासून तो संघासोबत काम करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्रॅहम रीड यांनी भारतीय प्रशिक्षकांसोबत सुरू केलेल्या आघाडीवीरांच्या कार्यशाळेत शिवेंद्र विशेष कामगिरी पार पाडत आहे. मुख्य प्रशिक्षकपदी रीड यांच्या नावाची शिफारस हॉकी इंडिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाने क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे. रीड यांच्यासह शिवेंद्र सिंग आणि विद्यमान विश्लेषणात्मक प्रशिक्षक ख्रिस सिरिएलो यांची साहाय्यक प्रशिक्षक म्हणून घोषणा होण्याची फक्त औपचारिकताच बाकी आहे. भारताला २०१०मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देण्यात शिवेंद्रने मोलाचा वाटा उचलला होता.