पीटीआय, ग्वेबेर्हा

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मंगळवारी जेव्हा मैदानावर उतरेल, तेव्हा संघ  व्यवस्थापनासमोर रजत पाटीदार किंवा रिंकू सिंह यापैकी कोणाला अंतिम अकरामध्ये स्थान द्यायचे याचे आव्हान असेल. अर्शदीप सिंग व आवेश खान यांसारख्या युवा वेगवान गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यास अडचण आली नाही. कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २०२२च्या एकदिवसीय मालिकेत ०-३ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात विजय नोंदवत मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचा संघाचा प्रयत्न राहील.

फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष

अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर कसोटी संघासोबत गेल्याने मध्यक्रमात एक जागी रिक्त झाली आहे. रिंकूने गेल्या काही काळापासून आपल्या फलंदाजीने सर्वाना प्रभावित केले आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२०मध्ये त्याने आपल्या खेळीने सर्वाचे लक्ष वेधले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना पूरक अशा खेळपट्टीवर रिंकू सहजपणे खेळताना दिसला. सध्या तो संघासाठी ‘विजयवीरा’ची भूमिका पार पाडत आहे. अशा स्थितीत चौथ्या स्थानावर अय्यरच्या जागी अंतिम अकरामध्ये पाटीदारची दावेदारी भक्कम दिसत आहे. कारण, स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघासाठी तो याच स्थानावर फलंदाजी करतो. पाटीदारने २०२२ मध्ये भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवले होते, मात्र त्याला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यानंतर वर्षभर त्याला दुखापतीचा सामना करावा लागला. संघाने या मालिकेत ‘विजयवीरा’च्या भूमिकेची जबाबदारी अनुभवी संजू सॅमसनला दिली आहे. तो राहुलनंतर सहाव्या स्थानी फलंदाजीस येईल.

हेही वाचा >>>IPL 2024 Auction: कोणते तीन आयपीएल संघ आहेत जे भारतीय यष्टीरक्षकाच्या शोधात आहेत? जाणून घ्या

गोलंदाजांकडून अपेक्षा

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डीकॉकच्या निवृत्तीनंतर संघाला सामंजस्य बसवणे अवघड जात आहे. अर्शदीप व आवेश यांच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फार काही करता आले नाही. मुकेश कुमारने मात्र, एकही गडी बाद न करता ४६ धावा दिल्या. संघ व्यवस्थापनाने प्रयोग करण्याचा विचार केल्यास मुकेशच्या जागी आकाश दीपला संधी देण्याचा विचार केला जाऊ शकतो.

’ वेळ : सायं. ४.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार अ‍ॅप.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.