नवी दिल्ली : भारताने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आपला आक्रमक फलंदाजीचा दृष्टिकोन कायम राखावा, असा सल्ला भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी दिला आहे.

डावाच्या सुरुवातीला पारंपरिक बचावात्मक प्रवृत्तीमुळे गतवर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले. मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांच्या कार्यकाळातील ती अखेरची स्पर्धा होती.

‘‘भारताने वृत्तीत अद्याप बदल केलेला नाही. दृष्टिकोन बदलल्यावर कदाचित काही सामन्यांत भारताला अपयश येईल, परंतु विजयाची सुरुवात झाल्यावर आत्मविश्वास उंचावेल,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

विराट कोहली विश्रांतीनंतर आणि केएल राहुल दुखापतीतून सावरत आशिया चषक स्पर्धेसाठी पुनरागमन करीत आहेत. या दोघांबाबत शास्त्री म्हणाले, ‘‘कोहली आणि राहुल पुरेशा प्रमाणात ‘आयपीएल’ आणि ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांना पुनरागमन अवघड जाणार नाही. ऋषभ पंत, हार्दिक पंडय़ा आणि रवींद्र जडेजा यांच्यामुळे भारताची मधली फळीसुद्धा बळकट झाली आहे. त्यामुळे आघाडीची फळी लवकर कोसळली, तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही.’’

हार्दिक आणि जसप्रित बुमराच्या खेळाच्या ताणाचा आढावा घेण्याची नितांत गरज आहे, अशी सूचना शास्त्री यांनी केली आहे.