पीटीआय, पुणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचे लक्ष्य दुसऱ्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे असेल. यासह पॉवरप्लेमधील शुभमन गिलच्या कामगिरीवरही नजरा असणार आहेत. गिल चांगली कामगिरी करताना सलामी फलंदाज म्हणून संघात आपली जागा भक्कम करण्याचा प्रयत्न करेल.

सलामीला गिल, इशानकडून अपेक्षा
सलामीच्या स्थानासाठी गिलला त्याचा प्रतिस्पर्धी ऋतुराज गायकवाडचे आव्हान असेल, त्यामुळे चांगली कामगिरी करून संघातील आपले स्थान भक्कम करण्याकडे त्याचे लक्ष्य असेल. भारताला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले असले, तरीही त्यांना दोन धावांनी विजय मिळवण्यात यश आले. या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार असून ट्वेन्टी-२० प्रारूपाला कमी प्राथमिकता असेल. तरीही, गिलला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. गेल्या सामन्यात ट्वेन्टी-२० पदार्पण करणाऱ्या गिल लयीत दिसला नाही. गिल गुजरात टायटन्सच्या आघाडीच्या फळीचा महत्त्वाचा भाग आहे. जलदगतीने धावा न केल्याने केएल राहुलला ट्वेन्टी-२० संघातील आपले स्थान गमवावे लागले. भारताकडे ट्वेन्टी-२० प्रारूपासाठी चांगले खेळाडू आहेत. ऋतुराज आणि राहुल त्रिपाठी संधीच्या प्रतीक्षेत आहेत. गिल आणि इशान किशनला उर्वरित सामन्यांसाठीही सलामीची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. या दोघांनीही आक्रमक सुरुवात केल्यास उर्वरित फलंदाजांचे काम सोपे होईल.

सूर्यकुमारवर मध्यक्रमाची मदार
भारताचा प्रयत्न दुसऱ्या सामन्यात अधिक धावा करण्याचा असणार आहे आणि यासाठी उपकर्णधार सूर्यकुमार यादववर संघ अवलंबून असेल. पहिल्या सामन्यात सूर्यकुमारला स्वस्तात माघारी परतावे लागले. श्रीलंकेची गोलंदाजी फिरकी गोलंदाज वािनदु हसरंगा आणि महेश तीक्षणा यांच्यावर अवलंबून आहे. या दोघांनीही पहिल्या सामन्यात मिळून आठ षटकांत ५१ धावा देत दोन बळी मिळवले. दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनीही या सामन्यात आपल्या फलंदाजीने प्रभावित केले. या सामन्यातही या दोन्ही खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

चहलच्या कामगिरीकडे नजरा
भारताचा लेग स्पिनर यजुर्वेद्र चहलकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. चहलने पहिल्या सामन्यात केवळ दोन षटके टाकताना २६ धावा दिल्या. यानंतर त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. या सामन्यात तो आपल्या कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेल. वेगवान गोलंदाज शिवम मावीच्या पदार्पणामुळे कर्णधार हार्दिक पंडय़ाला समाधान मिळाले असेल. पंडय़ानेही नवीन चेंडूने गोलंदाजी करताना प्रभावित केले.

वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदूी ( संबंधित एचडी वाहिन्या)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India sri lanka twenty20 series india second twenty20 match against sri lanka amy
First published on: 05-01-2023 at 02:26 IST