मोहम्मद शमी-जसप्रीत बुमराह-इशांत शर्मा या त्रिकुटाच्या माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २५८ धावांपर्यंत मजल मारली. एबी डिव्हीलियर्स आणि डीन एल्गर यांनी दिवसाच्या सुरुवातीला चांगली भागीदारी रचून आफ्रिकेची आघाडी वाढवण्यास मदत केली. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर ठराविक अंतराने आफ्रिकेचे फलंदाज माघारी परतत राहिले. कर्णधार फाफ डु प्लेसीसने तळातल्या फलंदाजाना हाताशी घेत आपली आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या सत्रानंतर आफ्रिकेचा संघ बचावात्मक खेळ करायला लागला, ज्यामुळे ३०० धावसंख्येपर्यंत पोहचू शकणारी आघाडी २८६ धावांपर्यंत सिमीत राहिली. मात्र सेंच्युरिअनची खेळपट्टी पाहता आफ्रिकेने भारताला विजयासाठी दिलेलं २८७ धावांचं आव्हान हे सोपं नक्कीच राहणार नाही.

चौथ्या दिवशी भारताकडून मोहम्मद शमीने सर्वात प्रथम आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. यानंतर जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्माने तळातल्या फलंदाजांना जास्तवेळ मैदानात टिकू दिलं नाही. शमीने दुसऱ्या डावात सर्वाधिक ४ तर जसप्रीत बुमराहने ३ बळी मिळवले. इशांत शर्माने २ तर रविचंद्रन आश्विनने दुसऱ्या डावात १ बळी मिळवला. दक्षिण आफ्रिकेकडे असणारी जलदगती गोलंदाजांची कुमक पाहता चौथ्या दिवसातलं अखेरचं सत्र भारतीय फलंदाजांना सावध पद्धतीने खेळून काढण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं.

मात्र दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय खडतर झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर झटपट माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराच्या मदतीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा मात्र निगडीच्या गोलंदाजीवर विराट पायचीत होऊन माघारी परतला. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि पार्थिव पटेल यांनी उरलेली षटकं खेळून काढत भारताची संभाव्य पडझड रोखली. सेंच्युरिअन कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची असल्यास अखेरच्या दिवसात भारताला अथक मेहनत घ्यावी लागणार आहे. आफ्रिकेला विजयासाठी अवघ्या ७ विकेट हव्या असल्यामुळे उद्याच्या दिवसात आफ्रिकेचा संघ कसा खेळतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

  • चौथ्या दिवसाचा खेळ थांबवला, आफ्रिकेला विजयासाठी ७ बळींची गरज
  • पार्थिव पटेल आणि चेतेश्वर पुजारा जोडीने भारताची संभाव्य पडझड थांबवली
  • निगडीच्या गोलंदाजीवर विराट पायचीत, भारताचा तिसरा गडी माघारी
  • भारताला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली माघारी
  • निगडीच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल माघारी, भारताला दुसरा धक्का. दोन्ही सलामीवीर माघारी
  • दुसऱ्या डावातही भारताची अडखळती सुरुवात, कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर विजय त्रिफळाचीत
  • भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचं आव्हान
  • रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर निगडी बाद, आफ्रिकेचा डाव २५८ धावांमध्ये आटोपला
  • आफ्रिकेचा नववा गडी माघारी, आघाडी २७० धावांची
  • कर्णधार फाप डु प्लेसीस माघारी, बुमराहने धाडलं माघारी
  • कगिसो रबाडा मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर माघारी, आफ्रिकेला आठवा धक्का
  • चहापानानंतर आफ्रिकेची सावध सुरुवात
  • चहापानापर्यंत आफ्रिकेची धावसंख्या २३०/७, आघाडी २५८ धावांची
  • डु प्लेसिस – रबाडाने आफ्रिकेचा डाव सावरला, कर्णधार डु प्लेसिसची संयमी खेळी
  • इशांत शर्माने केशव महाराजला पार्थिव पटेलकडे झेल द्यायला भाग पाडत धाडलं माघारी
  • केशव महाराजही ठराविक अंतराने माघारी, आफ्रिकेला सातवा धक्का
  • इशांत शर्माने आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली, वर्नेन फिलँडर माघारी. आफ्रिकेला सहावा धक्का
  • दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी, आफ्रिकेच्या आघाडीत धिम्या गतीने वाढं
  • फिलँडर – डु प्लेसीस जोडीने आफ्रिकेचा डाव सावरला
  • पहिल्या सत्रापर्यंत आफ्रिकेची धावसंख्या १७३/५, आघाडी २०१ धावांपर्यंत
  • कर्णधार फाफ डु प्लेसीस आणि वर्नेन फिलँडर जोडीने आफ्रिकेची पडझड थांबवली
  • मात्र शमीच्या गोलंदाजीवरच डी-कॉक माघारी, आफ्रिकेला पाचवा धक्का
  • सेंच्युरिअन कसोटीत भारतीय क्षेत्ररक्षकांकडून निराशा
  • शमीच्या गोलंदाजीवर क्विंटन डी-कॉकला दोनवेळा जीवदान
  • ठराविक अंतराने डीन एल्गर शमीच्या गोलंदाजीवर माघारी, आफ्रिकेला चौथा धक्का
  • डिव्हीलियर्स आणि एल्गरमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी
  • मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डिव्हीलियर्स माघारी, आफ्रिकेला तिसरा धक्का
  • अखेर आफ्रिकेची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश
  • दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
  • डिव्हीलियर्स – एल्गर जोडीची मैदानात चौफेर पटकेबाजी
  • दक्षिण आफ्रिकेने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा, आघाडीही शंभरीपलीकडे
  • एबी डिव्हीलियर्स आणि डिन एल्गर जोडीचा कडवा प्रतिकार
  • तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात