दुसरा वन-डे सामना जिंकत भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर १०५ धावांनी मात केली. भारताकडून कुलदीप यादवने प्रतिस्पर्धी संघाला दणका दिला आहे. विंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात ३ बळी घेत कुलदीपने विंडिजचं कंबरडच मोडलंय. शाय होप, इवन लुईस आणि जेसन होल्डरला कुलदीपने बाद केलं. तब्बल ६ गडी गारद झाल्याने दुसऱ्या वन-डे सामन्यात वेस्ट इंजिडचा संघाच्या आशा मावळल्या होत्या. आघाडीच्या ३ फलंदाजांनी निराशा केल्यानंतर जम बसलेल्या शाय होपलाही कुलदीप यावने माघारी धाडत विंडिजच्या उरल्या सुरल्या आशा संपवल्या. होपने ८८ चेंडुंमध्ये ८१ धावांची खेळी केली. ज्यात ५ चौकारांसह ३ षटकारांचा समावेश होता. याआधी सलामीवीर पॉवेलला भुवनेश्वर कुमारने माघारी धाडलं आहे. त्यापाठोपाठ जेसन मोहम्मदलाही भुवनेश्वरने भोपळाही न फोडता माघारी धाडलं. यानंतर होपने लुईसच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा मात्र लुईसला बाद करण्यात कुलदीप यादवला यश आलं आणि विंडिजला तिसरा धक्का बसला. शाय होपचा अपवाद वगळता सर्व विंडिज फलंदाज हजेरीबहाद्दर ठरलेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताकडून कुलदीप यादवने ३ बळी घेतले तर त्याला भुवनेश्वर कुमारने २ बळी घेत चांगली साथ दिली.

त्याआधी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर ३११ धावांचं आव्हान ठेवलं आहे. सलामीवीर अजिंक्य रहाणेचं शतक, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीच्या झुंजार फटकेबाजीमुळे भारताला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला. गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना ४३ षटकांचा करण्यात आला.

सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारताला शतकी भागीदारी करत भक्कम सुरुवात करुन दिली. शिखर धवन ६३ धावा काढून बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणाने संघाचा डाव सावरला. अजिंक्य रहाणेने दुसऱ्या विकेटसाठी विराट कोहलीसोबत ९७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान अजिंक्य रहाणेेने वन-डे सामन्यांमधलं आपलं तिसरं शतक झळकावलं. अजिंक्य रहाणेने १०४ चेंडुंमध्ये १०३ धावांची खेळी केली. यामध्ये १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. कर्णधार विराट कोहलीनेही रहाणेला उत्तम साथ दिली. किंबहुना अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर विराट कोहलीच्याच तुफान फटकेबाजीमुळे भारताला आपली धावसंख्या ३०० पार नेता आली. विराट कोहलीने ६६ चेंडुंमध्ये तडाखेबंद ८७ धावांची खेळी केली, ज्यात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

भारताच्या फलंदाजीच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे युवराज सिंहचा फॉर्म. गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही युवराज सिंह मोठी धावसंख्या उभारायला अपयशी ठरल्या. त्याचसोबत चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात तडाखेबंद खेळी करणारा हार्दीक पांड्याही फारशी चमक दाखवू शकला नाही. अवघ्या ४ धावा काढत तो माघारी परतला. त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने विंडिजच्या कमकुवत आणि स्वैर गोलंदाजीचा फायदा घेत भारताला ३१० ही धावसंख्या उभारुन दिली.

वेस्ट इंडिजकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो अल्झारी जोसेफ. जोसेफने २ भारतीय फलंदाजांना माघारी धाडलं. तर अॅशले नर्स, कर्णधार जेसन होल्डर आणि मिग्युएल कमिन्सने प्रत्येकी १-१ बळी मिळवत जोसेफला साथ दिली. मात्र अॅशले नर्सचा अपवाद वगळता कोणताही गोलंदाज भारताच्या वाढत्या धावसंख्येला खीळ बसवू शकला नाही.

या मालिकेतला तिसरा सामना येत्या शुक्रवारी खेळवला जाणार आहे, त्यामुळे त्या सामन्यात विंडिजचा संघ काय कमाल करतो हे पहावं लागणार आहे.

  • अखेर भारतीय संघाने सामना १०५ धावांनी जिंकला
  • कुलदीप यादवचा विंडिजला दणका, पदार्पणात ३ बळी
  • जम बसलेला शाय होपही माघारी
  • लुईस कुलदीप यादवचा शिकार, २१ धावांवर माघारी
  • शाय होपने लुईसच्या साथीने डाव सावरला, विंडिजचं शतक फलकावर
  • भुवनेश्वर कुमारचा विंडिजला आणखी एक धक्का, २ गडी तंबूत
  • विंडिजची अडखळती सुरुवात, पॉवेल भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद
  • कर्णधार जेसन होल्डरचा अखेरच्या षटकात स्वैर मारा, भारताची धावसंख्या ३०० च्या पार
  • ६५ चेंडुंत ८७ धावांची खेळी करुन विराट कोहली बाद
  • विराट कोहलीचं वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरुच
  • युवराज सिंहकडून पुन्हा निराशा, १४ धावा काढून बाद
  • विराट कोहलीचीही अर्धशतकी खेळी
  • युवराजऐवजी हार्दीक पांड्याला बढती, मात्र अवघ्या ४ धावांवर पांड्या बाद
  • शतकानंतर अवघ्या काही मिनीटात अजिंक्य रहाणे माघारी
  • भारताची धावसंख्या २०० पार
  • मुंबईकर अजिंक्य रहाणेची झुंजार शतकी खेळी
  • अजिंक्य रहाणे – विराट कोहलीने भारताचा डाव सावरला
  • अजिंक्य रहाणेचं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक
  • भारताला पहिला धक्का, शिखर धवन माघारी
  • भारतीय संघाचं शतक फलकावर
  • भारतीय सलामीवीरांपुढे वेस्ट इंडिज गोलंदाज हतबल
  • शिखर धवनची तुफान फटकेबाजी, सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक
  • रहाणे-धवनची धडाक्यात सुरुवात, संघाचं अर्धशतक फलकावर
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of west indies 2017 2nd one day port of spain trininad
First published on: 25-06-2017 at 17:55 IST