IND U19 vs AUS U19: भारतीय १९ वर्षांखालील संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ युथ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू आहे. मालिकेतील सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली होती. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ७० धावांची वादळी खेळी केली.

मालिकेतील पहिल्याच सामन्यात फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपल्या डावाची सुरूवात केली होती. पण त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले. सलामीवीर फलंदाज आयुष म्हात्रे स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीवर डाव सांभाळण्याची आणि टिकून खेळण्याची जबाबदारी होती. भारतीय संघाने सुरुवातीच्या १० षटकात ३९ धावा केल्या. यादरम्यान वैभवने ५४ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याला आपलं शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण या खेळीचं रूपांतर शतकी खेळीत करू शकला नाही. तो ६८ चेंडूत ७० धावा करत माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने ६ षटकार आणि ५ चौकार खेचले.

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात वैभवने ३८ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि ७ चौकार मारले होते. ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाने भारतीय १९ वर्षांखालील संघासमोर विजयासाठी २२६ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारतीय संघाने ७ गडी राखून पूर्ण केले होते. यासह भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी केली आहे. मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.