पीटीआय, ब्रिस्बेन

डावाच्या पहिल्या ३० षटकांत बचाव भक्कम ठेवून गोलंदाजांचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानंतर फलंदाजी करणे थोडे सोपे होते, अशी प्रतिक्रिया भारताचा सलामीचा फलंदाज केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळानंतर व्यक्त केली.

पावसामुळे प्रभावित या कसोटीत भारताला ‘फॉलोऑन’ची नामुष्की टाळण्यात यश आले. यामध्ये राहुलच्या खेळीचा मोठा वाटा होता. त्याने १३९ चेंडूंत ८४ धावांची झुंजार खेळी केली. ‘‘प्रत्येक फलंदाजाच्या स्वत:च्या योजना असतात. पहिली १०-१५ षटके खेळून काढली, तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. वेगवान आणि उसळी असलेल्या खेळपट्ट्यांवर या सुरुवातीच्या षटकांत गोलंदाजांचा आदर करणे महत्त्वाचे असते. अर्थात, आघाडीच्या फळीत फलंदाजी करताना तुम्हाला नशीबाची साथही असायला हवी. सुरुवातीला भक्कम बचाव, चेंडूची पारख आणि धावा करण्याचा प्रयत्न असे माझे नियोजन आहे, असे राहुलने सांगितले.

हेही वाचा >>>Prithvi Shaw Post : “देवा, आणखी मी काय करू?”, मुंबई संघातून डच्चू मिळाल्यानंतर पृथ्वी शॉचे हताश उद्गार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘ब्रिस्बेनमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. याचा या कसोटीवर मोठा परिणाम झाला आहे. बराचसा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. त्यामुळे आम्हाला सामन्यात टिकून राहण्यासाठी मार्ग शोधण्याची गरज होती. बुमरा आणि आकाश दीपने तो शोधला. तळातील फलंदाजांनी केलेल्या धावांमुळे कायमच मोठा फरक पडतो. आकाश आणि बुमरा यांनी नुसत्या धावाच केल्या नाहीत, तर उसळणारे चेंडू दूर ठेवण्यासाठी त्यांनी दाखवलेले धाडस महत्त्वाचे होते,’’ अशा शब्दांत राहुलने अखेरच्या जोडीचे कौतुक केले.