भारताच्या ‘हिटमॅन’चं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ ने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २८७ धावांचं आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहित शर्माने ११९ तर कर्णधार विराट कोहलीने ८९ धावा केल्या. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाची चांगलीच धुलाई केली आणि स्वाभिमानाची लढाई जिंकली, असं मत पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केलं.

“स्वाभिमानाची लढाई भारतानं जिंकली”

“विराट कोहली हा अप्रतिम कर्णधार आहे. तो मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर आहे. पुनरागमन कसं करावं हे त्याला नेमकं माहिती आहे. टीम इंडियाचे खेळाडूदेखील त्यात पारंगत आहेत. धक्कादायक पराभवानंतर ते कधीही धीर सोडत नाहीत. तुमच्या संघात जेव्हा रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांसारखे खेळाडू असतील आणि तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला बंगळुरूच्या मैदानावर ३०० पेक्षा कमी धावांवर बाद केलेत, तर तुम्ही नक्कीच सामना जिंकणार आहात ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ही मालिका म्हणजे स्वाभिमानाची लढाई होती. त्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ठेचलं”, असं अख्तर म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सध्याचा संघ ही नवी टीम इंडिया आहे. आम्ही ज्या संघाविरूद्ध खेळलो, तो संघ वेगळा होता. सध्याचा संघ अधिक आक्रमक आहे. पहिल्या सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतरही मालिका सहजतेने जिंकणं हे खूप कठीण असतं. बंगळुरूच्या मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाला चांगलंच कुटून काढलं. लहान मुलांशी खेळल्यासारखा हा सामना झाल्याचे दिसून आले”, असे निरीक्षण अख्तरने नोंदवले.

अख्तरकडून रोहितचा ‘उदो उदो’

जेव्हा रोहित शर्मा चांगल्या लयीत असतो, तेव्हा त्याच्यासाठी कोणताही चेंडू सोपा किंवा अवघड नसतो. बंगळुरूसारख्या खेळपट्टीवर तो आक्रमक खेळ करतो. एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा संघ देशात अव्वल होता, त्यावेळी ते क्रिकेटवर सत्ता गाजवत होते. आता भारतही तेच करतो आहे, असं अख्तरने नमूद केले.