India vs England ODI Result: भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने जिंकली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटा सामना रविवारी (१७ जुलै) मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडवर पाच गडी राखून विजय मिळवला. यष्टीरक्षक ऋषभ पंतचे धमाकेदार शतक आणि हार्दिक पंड्याची अष्टपैलू खेळी ही भारतीय डावाची वैशिष्ट्ये ठरली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका जिंकली आहे. अशी कामगिरी करणारा रोहित तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव ४५.५ षटकांमध्ये २५९ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने पाच गडी गमावून ४२.१ षटकात २६१ धावा करून सामना जिंकला. इंग्लंडने विजयासाठी दिलेले लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन एक आणि रोहित शर्मा १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर आलेला विराट कोहलीही जास्त वेळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. तो १७ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने पंतसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण तोही १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने शतकी भागीदारी करून डावाला आकार दिला. हार्दिक पंड्याने ५५ चेंडूत ७१ धावा केल्या. एकदिवसीय आणि टी २० क्रिकेट सामन्यात अर्धशतक करून चार बळी मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतने भारताला विजयी शेवट करून दिला. या दरम्यान पंतने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले. त्याने ११३ चेंडूंमध्ये नाबाद १२५ धावांची खेळी केली. त्यामध्ये १६ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होतो. डेव्हिड विलीने फेकलेल्या ४२व्या षटकामध्ये पंतने सलग पाच चौकार फटकावले.
त्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ४५.५ षटकांत २५९ धावांवर गुंडाळला गेला. या मालिकेत भारताने इंग्लंडला तिसऱ्यांदा ‘ऑलआउट’ केले आहे. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक ६० धावा केल्या. बटलर व्यतिरिक्त जेसन रॉयने ४१, मोईन अलीने ३४, क्रेग ओव्हरटनने ३२ आणि बेन स्टोक्स व लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी २७ धावांचे योगदान दिले.
भारताच्या वतीने हार्दिक पंड्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने सात षटकांत २४ धावा देऊन चार बळी घेतले. हार्दिकच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्याच्याशिवाय युझवेंद्र चहलने तीन, मोहम्मद सिराजने दोन तर रवींद्र जडेजाने एक बळी घेतला.