India vs England 3rd Test, Joe Root: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यातील पहिला दिवस इंग्लंडच्या नावे राहिला. बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान पहिल्या दिवशी इंग्लंडला ४ गडी बाद २५१ धावा करता आल्या. इंग्लंडकडून जो रूट ९९ धावांवर नाबाद माघारी परतला आहे. दरम्यान रूटच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
या सामन्यातील पहिल्या दिवशी जो रूट ९९ धावांवर नाबाद माघारी परतला. रूटने अर्धशतक पूर्ण करताच एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. जो रूटने भारतीय संघाविरुद्ध खेळताना ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा कारनामा त्याने आपल्या कारकिर्दीतील ६० व्या डावात पूर्ण केला आहे. यादरम्यान त्याने १० शतकं आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत. दुसऱ्या दिवशी १ धाव करताच तो भारतीय संघाविरुद्ध खेळताना आपले ११ व शतक पूर्ण करणार आहे.
या रेकॉर्डमध्ये आता रूटच्या आसपासही कोणी नाही. यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंग आहे. ज्याने २५५५ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूक या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. कूकने भारतीय संघाविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये २४३१ धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ या यादीत पाचव्या स्थानी आहे. स्मिथने भारताविरुद्ध खेळताना २३५६ धावा केल्या आहेत.
इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत
या सामन्यात इंग्लंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. इंग्लंडकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेली जॅक क्रॉली आणि बेन डकेटची जोडी स्वस्तात माघारी परतली. नितीश कुमार रेड्डीने दोघांनाही स्वस्तात माघारी धाडलं. त्यानंतर ओली पोपने ४४ धावांची खेळी करत जो रूटसोबत मिळून शतकी भागीदारी केली. हॅरी ब्रुक ११ धावा करत माघारी परतला. तर जो रूट ९९ धावांवर आणि बेन स्टोक्स ३९ नाबाद आहे. इंग्लंडला पहिल्या दिवसाअखेर ४ गडी बाद २५१ धावा करता आल्या आहेत.