India vs England 4th Test Highlights: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये मँचेस्टरच्या मैदानावर चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात ६६९ धावांचा भक्कम डोंगर उभारला. त्यामुळे इंग्लंडने मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघ अडचणीत होता. पण सुरुवातीला केएल राहुल – शुबमन गिल यांच्या जोडीने तर शेवटी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने मिळून भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढलं. दोघांनी दमदार शतकं झळकावली. यासह भारताला हा सामना वाचवण्यात यश आलं आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला ३५८ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ६६९ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. त्यामुळे भारतीय संघाला सामना वाचवायचा असेल तर पूर्ण पाचवा दिवस खेळून काढायचा होता. या डावाच्या सुरुवातीलाच ख्रिस वोक्सने भारतीय संघाला २ मोठे धक्के दिले. आधी यशस्वी जैस्वाल आणि पुढच्याच चेंडूवर साई सुदर्शनला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर केएल राहुल आणि शुबमन गिलने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला.
गिल आणि राहुलने मिळून १८८ धावांची दमदार भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारतीय संघ हा सामना गमावणार नाही, हे तर स्पष्ट झालं. केएल राहुलला शतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचं शतक थोडक्यात हुकलं. तो बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर ९० धावा करत माघारी परतला. त्यामुळे त्याचं शतक अवघ्या १० धावांनी हुकलं. त्यानंतर कर्णधार गिलने आपलं शतक पूर्ण केलं. गिल आणि राहुलने पाया रचल्यानंतर, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने मिळून भारतीय संघाला वाचवलं.
या जोडीने मिळून १०० हून अधिक धावांची भागीदारी केली. इंग्लंडचे खेळाडू हात जोडून सामना थांबवण्यासाठी विनंती करत होते. पण भारतीय खेळाडू काही थांबले नाहीत. जडेजा आणि वॉशिंग्टनने इंग्लंडच्या गोलंदाजांना पळवून पळवून मारलं. दोघांनी आपलं शतक पूर्ण केलं. ज्यावेळी रवींद्र जडेजाने आपलं शतक पूर्ण केलं त्यावेळी हॅरी ब्रुक हात मिळवण्यासाठी पुढे आला होता. पण त्याने मागे वळून पाहिलं नाही. जडेजाचं शतक पूर्ण झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने आपलं शतक पूर्ण केलं. मग गिलने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सामना ड्रॉ राहिला.