India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची मालिका सुरूच आहे. मालिकेतील ऋषभ पंत आणि बेन स्टोक्स दुखापतग्रस्त असल्यामुळे या सामन्यातून बाहेर आहेत. ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल आणि बेन स्टोक्सच्या जागी जेकब बेथलला संधी देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना आणखी एका खेळाडूला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं आहे.
मालिकेतील पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने दमदार गोलंदाजी केली. त्याने चांगली सुरुवात करून देत भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकलं. पहिल्याच सत्रात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. या मालिकेत भारतीय संघातील सर्वात विश्वासू ठरलेल्या केएल राहुलला अवघ्या १४ धावा करत माघारी धाडलं.
ख्रिस वोक्स दुखापतीमुळे बाहेर
तर झाले असे की, इंग्लंडकडून ५७ वे षटक टाकण्यासाठी जेमी ओव्हरटन गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर करुण नायरने फटका मारला. चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने जात होता. त्यावेळी ख्रिस वोक्स चेंडू अडवण्यासाठी धावला. त्याने डाईव्ह मारून चेंडू अडवला. यादरम्यान त्याच्या खांद्याला जबरदस्त दुखापत झाली. त्यानंतर फिजिओ मैदानात आले आणि त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले.
पहिल्या दिवशी काय घडलं?
या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर केएल राहुल देखील अवघ्या १४ धावांवर माघारी परतला. साई सुदर्शनने ३८ धावा केल्या. तर कर्णधार शुबमन गिल २१ धावांवर धावबाद होऊन माघारी परतला. रवींद्र जडेजाला ९ तर ध्रुव जुरेलला अवघ्या १९ धावा करता आल्या. तर करुण नायर ५२ आणि वॉशिंग्टन सुंदर १९ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाला पहिल्या दिवशी ६ गडी बाद २०४ धावा करता आल्या आहेत.