टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पाहण्यासाठी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पोहोचला. गांगुलीच्या क्रिकेट कारकिर्दीच्या अनेक सुंदर आठवणी या मैदानाशी जोडलेल्या आहेत. याच मैदानावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, या मैदानावर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात यजमानांचा पराभव केला. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसून टीम इंडियाचा तो विजय साजरा करण्यासाठी, गांगुलीने त्याचा शर्ट काढला आणि हवेत फिरवला. गांगुलीच्या उपस्थितीने क्रिकेट चाहत्यांच्या त्या सर्व आठवणी परत जाग्या झाल्या.

लॉर्ड्सवर सामना पाहण्यासाठी आलेल्या गांगुलीने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. लॉर्ड्स मैदानावरील काही निवडक छायाचित्रे शेअर करताना त्याने सोशल माडियावर एक पोस्ट शेअर केली. ”प्रथम १९९६मध्ये खेळाडू म्हणून, नंतर कर्णधार म्हणून येथे आलो. लॉर्ड्समध्ये आज प्रशासक म्हणून सामन्याचा आनंद घेतला. भारत तेव्हा चांगल्या स्थितीत होता आणि आजही आहे. हा क्रिकेटचा उत्तम खेळ आहे”, असे गांगुलीने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. गांगुलीच्या या पोस्टवर लॉर्ड्स क्रिकेटनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”तुम्हाला लॉर्ड्सवर सौरव पाहून खूप आनंद झाला”, असे लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडने म्हटले.

 

गांगुलीने चार फोटोंचा एक कोलाज शेअर केला आहे. पदार्पणाच्या सामन्यातील शतक, कसोटीतील कर्णधार, नेटवेस्ट ट्रॉफी आणि लॉर्ड्स यांचा संबंध गांगुलीने या फोटोत दाखवला आहे. २००२मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला. त्यावेळी नासीर हुसेन इंग्लंड संघाचा कर्णधार होता. युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे भारताला ऐतिहासिक विजय मिळवता आला. गांगुलीने या विजयाची आठवण करून देत इंग्लंडच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील लॉर्ड्सवर होते. शुक्ला आणि गांगुलीने जेफरी बॉयकॉट आणि यूकेचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यासोबतही फोटो काढला.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या दिवसअखेर भारत

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताने ३ बाद २७६ धावा केल्या आहेत. केएल राहुल १२७ धावांवर नाबाद आहे. भारताकडून रोहित शर्माने ८३ आणि विराट कोहलीने ४२ धावा केल्या. अजिंक्य रहाणे एका धावेवर राहुलसोबत नाबाद आहे. चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला, तो अवघ्या ९ धावा करून बाद झाला.