भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका : श्रेयस-साहाने सावरले! ; अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी नऊ बळींची आवश्यकता

भारताने ७ बाद २३४ धावांवर दुसरा डाव घोषित करून न्यूझीलंडपुढे विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले

कानपूर : मुंबईकर श्रेयस अय्यरने (१२५ चेंडूंत ६५ धावा) पदार्पणातील लढत अधिक संस्मरणीय बनवताना रविवारी अर्धशतक झळकावले. त्याला अनुभवी वृद्धिमान साहाची (१२६ चेंडूंत नाबाद ६१ धावा) उत्तम साथ लाभली. आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर श्रेयस-साहा या जोडीने दडपणाखाली कामगिरी उंचावल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे.

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ७ बाद २३४ धावांवर दुसरा डाव घोषित करून न्यूझीलंडपुढे विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात दिवसअखेर न्यूझीलंडची १ बाद ४ धावा अशी स्थिती असून अखेरच्या दिवशी त्यांना विजयासाठी आणखी २८० धावांची, तर भारताला नऊ बळींची आवश्यकता आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने विल यंगच्या (२) रूपात पाहुण्यांना पहिला धक्का दिला. सलामीवीर टॉम लॅथम २, तर विल्यम समरविले शून्यावर खेळत आहे.

शनिवारच्या १ बाद १४ धावांवरून पुढे प्रारंभ करताना कायले जेमिसन (३/४०) आणि टिम साऊदी (३/७५) यांच्या वेगवान जोडीपुढे भारताची तारांबळ उडाली. जेमिसनने चेतेश्वर पुजाराला (२२) जाळय़ात अडकवले, तर साऊदीने एकाच षटकात मयांक अगरवाल (१७) आणि रवींद्र जडेजा (०) यांना माघारी पाठवले. फिरकीपटू एजाझ पटेलने कर्णधार अजिंक्य रहाणेला (४) पायचीत पकडले. त्यामुळे एक वेळ भारताची ५ बाद ५१ धावा अशी त्रेधातिरपीट उडाली. विशेषत: रहाणे, पुजारा यांसारखे अनुभवी फलंदाज दुसऱ्या डावातही अपयशी ठरल्यामुळे भारताचा डाव शतकाची वेस ओलांडण्यापूर्वीच आटोपणार, अशी चिन्हे दिसू लागली.

परंतु पहिल्या डावात शतक साकारणाऱ्या श्रेयसने सातव्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अश्विनच्या साथीने संघाचा डोलारा सावरला. दोघांनी सहाव्या गडय़ासाठी महत्त्वपूर्ण ५२ धावांची भर घातली. अश्विन ३२ धावांवर जेमिसनच्या गोलंदाजीवर दुर्दैवीरीत्या त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मानेच्या दुखापतीसह फलंदाजीस उतरलेल्या यष्टीरक्षक साहाने श्रेयसला साथ दिली.

दोघांनी धावांची गतीही वाढवत भारताला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला. साऊदीला पूल लगावण्याच्या प्रयत्नात श्रेयस बाद झाला, परंतु त्यापूर्वी त्याने आठ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ६५ धावा करतानाच साहासोबत सातव्या गडय़ासाठी ६४ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर साहाने २०१७ नंतर प्रथमच आणि कारकीर्दीतील एकंदर सहावे अर्धशतक झळकावून भारताची आघाडी पावणेदोनशे धावांपलीकडे नेली. अक्षर पटेलनेही (२८) उपयुक्त योगदान दिले. या दोघांनी आठव्या गडय़ासाठी ६७ धावांची अभेद्य भागीदारी रचल्यावर कर्णधार रहाणेने २३४ धावांवर डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.

श्रेयस हा पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

अश्विनने (४१७ बळी) भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले. त्याने हरभजन सिंगशी बरोबरी केली.

२८४ भारतातील कसोटीत अद्याप परदेशी संघाने चौथ्या डावात २८४ धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही. १९८७ मध्ये वेस्ट इंडिजने दिल्ली येथे २७६ धावांचे लक्ष्य गाठले होते.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ३४५

न्यूझीलंड (पहिला डाव) : २९६

भारत (दुसरा डाव) : ८१ षटकांत ७ बाद २३४ डाव घोषित (श्रेयस अय्यर ६५, वृद्धिमान साहा ६१*; कायले जेमिसन ३/४०)

न्यूझीलंड (दुसरा डाव) : ४ षटकांत १ बाद ४ (टॉम लॅथम खेळत आहे २, विल यंग २; रविचंद्रन अश्विन १/३)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs new zealand 1st test day 4 india dominate new zealand require 280 runs on day 5 zws

ताज्या बातम्या