रचिन-एजाझच्या झुंजीमुळे न्यूझीलंडला कसोटी अनिर्णित राखण्यात यश; श्रेयस सामनावीर

कानपूर : रचिन रवींद्र (९१ चेंडूंत नाबाद १८ धावा) आणि एजाझ पटेल (२३ चेंडूंत नाबाद २ धावा) या भारतीय वंशाच्या जोडीने सोमवारी भारताच्या विजयाचा घास हिरावला. पाचव्या दिवसातील अखेरच्या नऊ षटकांत विजयासाठी आवश्यक एक बळी मिळवण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्याने न्यूझीलंडने पहिला कसोटी क्रिकेट सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.

अंधूक सूर्यप्रकाशामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या या लढतीत भारताने दिलेल्या २८४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ९ बाद १६५ धावाच केल्या. परंतु फिरकीला पोषक खेळपट्टीवर ठाण मांडण्याचे कार्य न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चोखपणे केले. उभय संघांतील दुसरी कसोटी शुक्रवार, ३ डिसेंबरपासून मुंबईत खेळवण्यात येणार आहे.

रविवारच्या १ बाद ४ धावांवरून पुढे खेळताना टॉम लॅथम (५२) आणि विल्यम समरव्हिले (३६) यांनी पहिल्या सत्रात अप्रतिम फलंदाजी करत भारताला एकही बळी मिळू दिला नाही. दुसऱ्या सत्रातील पहिल्याच चेंडूवर उमेश यादवने समरव्हिलेला बाद करून ही जोडी फोडली. समरव्हिलेने दुसऱ्या गडय़ासाठी लॅथमसह ७६ धावांची भर घातली.

त्यानंतर कर्णधार केन विल्यम्सनने लॅथमच्या साथीने भारतीय गोलंदाजांना हैराण केले. परंतु सलग दुसरे अर्धशतक झळकावल्यावर लॅथम रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला, तर रवींद्र जडेजाने रॉस टेलरला (२) पायचीत पकडून न्यूझीलंडची ४ बाद १२५ अशी अवस्था केली.

अखेरच्या सत्रात सहा बळींची आवश्यकता असताना जडेजाने धोकादायक विल्यम्सन (२४), कायले जेमिसन (५), टिम साऊदी (४) या तिघांनाही पायचीत पकडले. हेन्री निकोल्सला (१) अक्षर पटेलने आणि टॉम ब्लंडेलला (२) अश्विनने तंबूची वाट दाखवली. त्यामुळे न्यूझीलंडची ९ बाद १५५ धावा अशी तारांबळ उडाली; परंतु रचिन-एजाझ या अखेरच्या जोडीने ५२ चेंडू खेळून काढल्याने भारताचा विजय निसटला.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : ३४५

’ न्यूझीलंड (पहिला डाव) : २९६

’ भारत (दुसरा डाव) : ७ बाद २३४ डाव घोषित

’ न्यूझीलंड (दुसरा डाव) : ९८ षटकांत ९ बाद १६५ (टॉम लॅथम ५२, विल्यम समरव्हिले ३६; रवींद्र जडेजा ४/४०)

द्रविडकडून मैदान कर्मचाऱ्यांना बक्षीस

भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सोमवारी कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमच्या मैदानाची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये भेट म्हणून दिले. पाचव्या दिवसातील अखेरच्या सत्रापर्यंत लांबलेली कसोटी आणि फलंदाजी-गोलंदाजी दोघांनाही समान सहाय्य करणारी खेळपट्टी बनवल्यामुळे द्रविडने कर्मचाऱ्यांचे कौतुक करतानाच त्यांना ही रक्कम देत एक नवा आदर्श ठेवला.

रविचंद्रन अश्विनने (४१९) भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले. अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४) हे या यादीत पहिल्या दोन स्थानांवर विराजमान आहेत.

श्रेयस अय्यर हा पदार्पणाच्या कसोटीत सामनावीर पुरस्कार पटकावणारा सातवा भारतीय खेळाडू ठरला असून यामध्ये एकूण चार मुंबईकरांचाही समावेश आहे. यापूर्वी प्रवीण अमरे, रुद्रप्रताप सिंग, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ या सहा जणांनी अशी कामगिरी केली होती.