दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापाठोपाठ न्यूझीलंडमध्येही भारतावर पराभवाचेच पाढे वाचायची वेळ आली. न्यूझीलंडच्या दौऱ्यावरही विजयासाठी आसुसलेल्या भारताच्या पदरी चौथ्या एकदिवसीय सामन्यातही पराभवच पडला आणि त्यांना ही मालिकादेखील गमवावी लागली. यजमान न्यूझीलंडने भेदक गोलंदाजी आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण फलंदाजांच्या जोरावर चौथा एकदिवसीय सामना ७ विकेट्सनी जिंकत मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलरने दमदार नाबाद शतक झळकावत किवींच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आणि त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताच्या २७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तीन फलंदाज गमावत न्यूझीलंडने लीलया विजय मिळवला. २ बाद ५८ अशी अवस्था असताना भारताने फिरकी आक्रमणासह न्यूझीलंडवर दबाव आणला होता, पण स्थिरस्थावर झाल्यावर भारताच्या एकाही गोलंदाजाला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जुमानले नाही. रॉसने ‘टेलरमेड’ फटके चपखलपणे लगावत भारतीय मारा निष्प्रभ केला. सुरुवातीला काही चेंडू निर्धाव सोडत, त्याने एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. अधेमधे या लयीला एखाद्या चौकाराची जोड देत धावगती अलगदपणे वाढवली आणि संघाचा विजयपथ रचला. या वेळी त्याने केन विल्यम्सन (६०) आणि ब्रेंडन मॅक्क्युलम (४९) यांच्याबरोबर तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी अनुक्रमे १३० आणि नाबाद ९२ धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विल्यम्सनचे हे चौथ्या सामन्यातील चौथे अर्धशतक असून यामधून त्याचे सातत्य जाणवते. टेलरने १२७ चेंडूंत १५ चौकारांच्या जोरावर नाबाद ११२ धावांची अप्रतिम खेळी साकाली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. २ बाद २२ अशी अवस्था झाली असताना आतापर्यंत निष्क्रिय ठरलेल्या रोहित शर्माने ६ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ७९ धावांची खेळी साकारत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. तो बाद झाल्यावर भारतीय संघ पुन्हा अडचणीत सापडला. पण कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी १३६ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला २७८ धावांपर्यंत मजल मारून दिली. धोनीने ६ चौकार व ३ षटकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची खेळी साकारली, तर जडेजाने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावांची खेळी साकारत धोनीला चांगली साथ दिली.

फलंदाजीमध्ये आम्ही सातत्याने चुका केल्या. महत्त्वाच्या क्षणी आम्ही विकेट्स गमावल्या आणि मालिकेमध्ये या चुका पाहायला मिळाल्या. पण तरीही या सामन्यात आम्ही २८० धावांच्या जवळ पोहोचलो. माझ्या मते ही आव्हानात्मक धावसंख्या होती. पण आमच्या वेगवान गोलंदाजांना भेदक मारा करीत न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखता आले नाही. फिरकीपटूंनी मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी केली. चांगली सुरुवात करूनही आम्ही जास्त चौकार दिल्याने न्यूझीलंडला झटपट धावा जमवता आल्या.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार.

विश्वविजेत्या भारतीय संघाला पराभूत करणे, ही आमच्यासाठी फार मोठी बाब आहे. एकदिवसीय मालिकांमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनंतर भारताबरोबरची आमची कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे. दौऱ्यावर येण्यापूर्वी भारतीय संघ अव्वल क्रमांकावर विराजमान होता, पण त्यांच्या धावांना कशी वेसण घालायची, याची रणनीती आम्ही आखली होती आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. चार सामन्यांमध्ये ३-० अशी विजयी आघाडी मिळवणे, हे आमच्यासाठी नक्कीच भूषणावह आहे. यापुढे कामगिरीमध्ये सातत्य ठेवण्याचाच आमचा प्रयत्न असेल.
ब्रेंडन मॅक्क्युलम, न्यूझीलंडचा कर्णधार.

धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. राँची गो. विल्यम्सन ७९, विराट कोहली झे. नीशाम गो. साऊथी २, अजिंक्य रहाणे झे. साऊदी गो. मिल्स ३, अंबाती रायुडू झे. राँची गो. बेनेट ३७, महेंद्रसिंग धोनी नाबाद ७९, आर. अश्विन झे. बेनेट गो. साऊदी ५, रवींद्र जडेजा नाबाद ६२, अवांतर (लेगबाइज ४, वाइड ७) ११, एकूण ५० षटकांत ५ बाद २७८.
बाद क्रम : १-५, २-२२, ३-१०१, ४-१४२, ५-१५१.
गोलंदाजी : कायले मिल्स १०-२-४२-१, टीम साऊदी १०-१-३६-२, हमिश बेनेट ९-०-६७-१, जेम्स नीशाम ८-०-५९-०, नॅथम मॅक्क्युलम १०-०-४४-०, केन विल्यम्सन ३-०-२६-१.
न्यूझीलंड : मार्टिन गप्तिल पायचीत गो. शमी ३५, जेसी रायडर त्रिफळा गो. जडेजा १९, केन विल्यम्सन धावचीत ६०, रॉस टेलर नाबाद ११२, ब्रेन्डन मॅक्क्युलम नाबाद ४९, अवांतर (बाइज १, वाइड ३, नो बॉल १) ५, एकूण ४८.१ षटकांत ३ बाद २८०.
बाद क्रम : १-५४, २-५८, ३-१८८.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-६२-०, मोहम्मद शमी ८-०-६१-१, वरुण आरोन ६.१-०-५१-१, रवींद्र जडेजा १०-२-३३-०, आर. अश्विन १०-०-४१-०, स्टुअर्ट बिन्नी १-०-८-०, अंबाती रायुडू ३-०-२३-०.
सामनावीर : रॉस टेलर.