भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्व १० बळी घेणारा जगातील तिसरा गोलंदाज बनून भारताविरुद्ध इतिहास रचला आहे. एजाजच्या आधी इंग्लंडच्या जिम लेकर आणि भारताचा अनिल कुंबळे यांनी हा पराक्रम केला आहे.

त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी एजाज पटेलने अभिनंदन केले आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यानेही एजाज पटेलचे अभिनंदन केले आहे. तसेच त्याने ट्विट करत देश सोडून जा म्हणणाऱ्यांनाही टोला लगावला आहे.

“कृपया कोणत्याही भारतीयाला इतर कोणत्याही देशात जाऊ देऊ नका, तसे त्यांना विचारू नका. दस का दम,” असे इरफानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी पटेलनेच विकेट्स मिळवल्या होत्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर पहिल्याच दिवशी पटेलचे बळी ठरले होते. पुजारा आणि कोहली यांना खातेही उघडता आले नाही. दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करायला आलेल्या पटेलचा अंदाज वेगळा होता. दिवसाच्या सुरुवातीलाच ऋद्धिमान साहाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

 भारताची धावसंख्या ३०० धावांवरही झाली नव्हती की शतकवीर मयंक अग्रवालही पटेलच्या फिरकीत झेलबाद झाला. पटेलने तोपर्यंत सात विकेट घेतल्या होत्या. त्याने अक्षर पटेलची आठवी विकेट घेतली. त्यानंतर त्याला यादवची विकेटही मिळाली. त्यानंतर मोहम्मद सिराज बाद होताच पटेल यांची इतिहासाच्या पानात नोंद झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एजाज पटेल यांच्या कुटुंबाचे आजही मुंबईतील जोगेश्वरी भागात घर आहे. त्याची आई ओशिवारा येथील शाळेत शिकवायची. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचे सामने पाहण्यासाठी एजाज स्वतः अनेकदा वानखेडे स्टेडियमवर यायचा. त्याने त्याचा मित्र मिशेल मॅक्लेनाघनमुळे काही प्रसंगी मुंबईच्या खेळाडूंनासाठी गोलंदाजी केली. न्यूझीलंडची कसोटी जर्सी घालून तो स्वत: वानखेडेवर गोलंदाजी करायला उतरला तेव्हा तो विक्रम करेल हे कोणाला वाटत नव्हते. पटेलने आपल्या गोलंदाजीने कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. कसोटीच्या एका डावात १० बळी घेणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.