भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषकादरम्यान झालेला पहिला सामना पावसानं धुवून नेला. त्यामुळे दोन्ही देशांमधल्या क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली. या सामन्यात भारताची फलंदाजी झाल्यानंतर झालेल्या पावसामुळे पूर्ण सामनाच रद्द करून दोन्ही संघांना एकेक गुण बहाल करण्यात आला. यावेळी पाकिस्तान तीन गुणांसह सुपर फोरमध्ये दाखल झालं. मात्र, सोमवारी दुबळ्यानेपाळ संघाला लीलया पराभूत करत भारतानं आपलं सुपर ओव्हरचं तिकीट कन्फर्म केलं. मात्र, याचबरोबर पाकिस्तानशी पुन्हा एकदा सामना होण्यावरही शिक्कामोर्तब केलं!

भारताचा नेपाळवर दणदणीत विजय

सोमवारी नेपाळविरोधात झालेल्या सामन्यामध्ये भारतानं तब्बल १० विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला. भारतानं गोलंदाजी स्वीकारून नेपाळला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पण सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत नेपाळच्या फलंदाजांनी अत्यंत चिवट खेळ करत बलाढ्य भारतासमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान ठेवलं. भारताची दिग्गज सलामीवीरांची जोडी, अर्थात कर्णधार रोहित शर्मा शुबमन गिल यांनी डावाला सावध सुरुवात केली खरी. मात्र, पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली. पावसामुळे तब्बल दीड तासाचा खेळ वाया गेल्यामुळे सामना थेट २३ षटकांचा झाला. विजयासाठीचं आव्हानही कमी होऊन १४५पर्यंत खाली आलं.

पावसाच्या ब्रेकनंतर मैदानावर उतरलेल्या भारताच्या सलामीच्या जोडीने नेपाळच्या एकाही गोलंदाजाला यश मिळू दिलं नाही. रोहित शर्मा (नाबाद ७४) व शुबमन गिल (नाबाद ६७) या दोघांनी १४७ धावांची अभेद्य सलामी देत भारताला लीलया विजय मिळवून दिला.

कशी बदलली आकडेमोड?

दरम्यान, या सामन्याआधी पाकिस्ताननं दोन सामन्यांमध्ये एक विजय व एका सामन्यातील एक गुण अशा तीन गुणांसह सुपर फोरमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ग्रुप ‘ए’मध्ये गुणतालिकेत ४.७६ इतक्या भरभक्कम नेट रनरेटसह पाकिस्तान अव्वल स्थानी आहे. कालच्या सामन्यानंतर भारताचेही गुण एक विजय व एका सामन्यातील एक गुणासह तीनवर गेले व भारत अपेक्षेप्रमाणे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला. त्यामुळे पाकिस्तानसह सुपर फोरमध्ये भारताचं स्थानही निश्चित झालं.

IND vs NEP: रोहित-शुबमनची शानदार अर्धशतके! १० गडी राखून भारताने दुबळ्या नेपाळचा केला सुपडा साफ, सुपर ४ पोहचली टीम इंडिया

आशिया चषकाचं वेळापत्रक!

दरम्यान, आशिया चषकाच्या नियोजनानुसार लीग स्तरावरील ग्रुपमधील पहिल्या दोन संघांमध्ये सुपर फोर स्तरावर पुन्हा सामना होतो. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातच सुपर फोरमधला पहिला सामना होणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या १० सप्टेंबर रोजी हा सामना श्रीलंकेत होणार आहे. पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी सुपर फोरमधील सर्व सामने आता श्रीलंकेतील हंबनटोटामध्ये खेळवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फायनलमध्येही भिडत होण्याची शक्यता?

दरम्यान, येत्या १० सप्टेंबर रोजी हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. मात्र, सुपर फोरमधील पुढचे निकाल जर या दोन्ही संघांच्या बाजूने लागले, तर आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे.