वृत्तसंस्था, कोलंबो
भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील द्वंद्व पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. फरक इतकाच की, याआधी आशिया चषकात पुरुष संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते, तर आता महिला संघ एकदिवसीय विश्वचषकात समोरासमोर येतील. या वेळी भावना आणि क्रिकेट कौशल्य यांच्यातील आणखी एक संघर्ष बघायला मिळणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने राबवलेले ऑपरेशन सिंदूर याच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीच बिघडले आहेत. याचे पडसाद आशिया चषकातही उमटले होते. आता महिला विश्वचषक स्पर्धेतही परिस्थिती फारशी वेगळी असण्याची अपेक्षा नाही. पुरुष संघाप्रमाणेच पाकिस्तानी महिला संघाची कामगिरीही फारशी चांगली नाही. तुलनेने भारतीय संघ अधिक भक्कम दिसून येत आहे. त्यामुळे कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीसाठी भारताचेच पारडे जड मानले जात आहे.

भारतीय महिला संघानेही पाकिस्तानवर पूर्ण वर्चस्व राखले असून, आतापर्यंत खेळलेल्या २७ पैकी तब्बल २४ सामन्यांत भारताने विजय मिळविला आहे. ही आकडेवारी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांतील आहे. पाकिस्तानचे तीनही विजय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध सर्व ११ सामने जिंकण्याची किमया साधली आहे.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही पाकिस्तानची अपयशी सुरुवात झाली. बांगलादेशकडून त्यांना सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला, तर भारताने श्रीलंकेवर विजय मिळविला होता. सर्व संघांचा एकेक सामना झाल्यानंतर भारत चौथ्या स्थानावर असून, साखळीच्या अखेरीस निर्णायक ठरणारी निव्वळ धावगती सुधारण्याचा आता भारताचा प्रयत्न असेल.

अखेरच्या खेळाडूपर्यंत असलेली परिपूर्ण क्षमता ही भारतीय महिला संघाची ताकद आहे. त्यामुळेच श्रीलंकेविरुद्ध ६ बाद १२४ अशा स्थितीतूनही भारतीय महिला संघ निर्धारित ४७ षटकांच अडीचशेहून अधिक धावांची मजल मारू शकला होता. स्मृती मनधाना आणि प्रतिका रावल यांची सलामी महत्त्वाची ठरणार आहे. मधल्या फळीने नांगर टाकल्यास अखेरच्या षटकांत अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा फटकेबाजी करू शकतील.

या मैदानावर यापूर्वी झालेल्या बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सुरुवातीलाच चेंडू चांगल्या पद्धतीने सीम होत होता. त्यामुळे भारताला रेणुका सिंह ठाकूरला खेळविण्याचा मोह होऊ शकतो.

तुलनेत पाकिस्तानची फलंदाजी खूपच दुबळी आहे. बांगलादेशाच्या गोलंदाजांसमोर त्यांच्या फलंदाजी तंत्रातील उणिवा स्पष्ट झाल्या होत्या. त्यामुळे अनुभवी भारतीय गोलंदाजांसमोर आज पाकिस्तानच्या फलंदाजीची कसोटी लागणार आहे. गोलंदाज फातिमा सना आणि डायना बेग यांचा मारा शिस्तबद्ध राहिला असला, तरी त्यांना धावांचे पाठबळ नव्हते, हेच पाकिस्तानच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले होते. पाकिस्तान संघ त्यांचे सर्व सामने कोलंबोत खेळणार आहे. या संधीचा फायदा त्यांना होऊ शकतो, पण त्यासाठी त्यांना आपले सर्वस्व पणाला लावावे लागेल.

तणाव राहणारच…

पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान या संघांतील खेळाडूंत बराच संघर्ष पाहायला मिळाला होता. आता हा तणाव महिलांच्या सामन्यातही कायम राहणार असल्याचेच संकेत आहेत. भारतीय महिला खेळाडूही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नाणेफेकीदरम्यान सूत्रसंचालनाची जबाबदारी कोण पार पाडणार याबाबतही अद्याप स्पष्टता नाही.