India vs Pakistan Final Playing XI दुबई : भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी सलग तिसऱ्या रविवारी आमनेसामने येणार आहेत. मात्र, यावेळच्या लढतीला अतिरिक्त महत्त्व प्राप्त झाले असून या लढतीतून आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचा विजेता ठरणार आहे. याआधीच्या दोन लढतींत भारताने सहज बाजी मारली होती. आता भारतीय संघ आपली मक्तेदारी कायम राखणार की पाकिस्तानचा संघ धक्कादायक निकाल नोंदविणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारतीय संघाने साखळी फेरीपाठोपाठ ‘अव्वल चार’ फेरीच्या लढतीतही पाकिस्तानवर मात केली होती. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताने आजवर पाकिस्तानविरुद्ध १५ सामने खेळले असून त्यापैकी १२ सामन्यांत सरशी साधली आहे. त्यामुळे आता या दोन संघांतील सामन्यांना ‘तुल्यबळांतील द्वंद्व’ म्हणणे थांबवले पाहिजे, असे परखड मत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले होते. मात्र, आता हेच वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान भारतासमोर असणार आहे.
यंदा भारत-पाकिस्तान सामन्यांत मैदानावरील खेळ आणि मैदानाबाहेरील राजकारण यांच्यातील रेषा पुसट करणाऱ्या घटना घडल्या आहेत. दोन्ही संघांच्या कामगिरीपेक्षा हस्तांदोलन टाळणे, विमाने पाडल्याची आणि बॅटचा बंदुकीसारखा वापर करून हवेत गोळ्या झाडण्याची ‘आक्षेपार्ह’ कृती करणे, त्यानंतर सामनाधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई होणे, अशा घटनांचीच चर्चा अधिक झाली आहे. या सगळ्यात पाकिस्तान क्रिकेट संघटना (पीसीबी) आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनीही ‘एक्स’वर वारंवार वादग्रस्त पोस्ट केल्याने परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. आता अंतिम फेरीत हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वेळ : रात्री ८ वा.
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस टेन १, ३
सरस कामगिरी…
मैदानावर पाकिस्तानच्या तुलनेत भारताने सरस कामगिरी केली आहे. भारतीय संघाने यंदाच्या आशिया चषकातील आपले सहाही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानला सहापैकी चार सामने जिंकण्यात यश आले आहेत. पाकिस्तानला दोनही पराभव भारताविरुद्धच पत्करावे लागले. यात विशेषत: पाकिस्तानच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. आता पाकिस्तानी फलंदाज कामगिरी उंचावतात की भारतीय गोलंदाज त्यांना पुन्हा अडचणीत टाकतात, यावर या सामन्याचा निकाल ठरू शकेल.
अभिषेक, हार्दिकची उपलब्धता अपेक्षित
– श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाने ‘सुपर ओव्हर’मध्ये विजय मिळवला. या सामन्यादरम्यान सलामीवीर अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना स्नायूच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले होते. मात्र, हे दोघेही अंतिम लढतीत खेळणे अपेक्षित आहे.
– भारतीय संघाच्या फलंदाजीची भिस्त पुन्हा अभिषेकच असेल. अभिषेकने या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात किमान ३० धावांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच त्याने सहा सामन्यांत ३०९ धावा करताना आशिया चषकाच्या एका पर्वात सर्वाधिक धावांचा पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा (२८१) विक्रम मोडीत काढला आहे.
– मधल्या फळीत भारताला कर्णधार सूर्यकुमार यादवच्या कामगिरीची चिंता आहे. सूर्यकुमारला या वर्षी आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १० डावांत केवळ ९९ धावा करता आल्या आहेत. आशिया चषकात सुरुवातीच्या १० षटकांनंतर चेंडूचा टणकपणा कमी होत असल्याने फलंदाजांना धावा करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागत आहे. सूर्यकुमारला मैदानाच्या मागील बाजूस फटके मारणे अवघड जात आहे.
– गोलंदाजीत भारताची मदार कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या फिरकी त्रिकुटावर असेल. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराला विश्रांती दिली. मात्र, अंतिम लढतीसाठी त्याचे पुनरागमन निश्चित आहे.
शाहीन, झमानवर मदार
– पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली असली, तरी त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. शाहीन शाह आफ्रिदीने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चमक दाखवली आहे. विशेषत: गेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्ध त्याने प्रत्येकी तीन बळी मिळवण्याची कामगिरी केली. आता त्याच्यापासूनच भारताला सावध राहावे लागेल.
– फिरकी गोलंदाज अबरार अहमदची भूमिकाही पाकिस्तानसाठी महत्त्वाची ठरेल. सैम अयुब फलंदाजीत सपशेल अपयशी ठरत आहे. सहापैकी चार सामन्यांत त्याला खातेही उघडता आलेले नाही. परंतु त्याची फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरते आहे. भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात त्याने तीन बळी मिळवले होते. त्यामुळे त्याच्याकडून पाकिस्तानला अपेक्षा असतील.
– पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाच्या कामगिरीत सातत्य नाही. भारताविरुद्धच्या गेल्या सामन्यात साहिबझादा फरहानने अर्धशतक साकारले. मात्र, अन्य सामन्यांत त्याला फारशी चमक दाखवता आलेली नाही.
– पाकिस्तानसाठी अनुभवी सलामीवीर फखर झमानची कामगिरी निर्णायक ठरू शकेल. झमानमध्ये पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत खेळण्याची क्षमता आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर सुरुवातीच्या षटकांत फलंदाजी करणे काहीसे सोपे ठरते आहे. अशात झमानचा भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न असेल.
संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा. पाकिस्तान : सलमान अली आघा (कर्णधार), साहिबझादा फरहान, फखर झमान, सैम अयुब, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), अबरार अहमद, फहीम अश्रफ, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाझ, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम ज्युनियर, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मोकीम.