भारताला विजयासाठी आठ बळींची, तर आफ्रिकेला १११ धावांची आवश्यकता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केप टाऊन : यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने (नाबाद १००) केलेल्या झुंजार शतकामुळे भारताने तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात यजमान दक्षिण आफ्रिकेपुढे २१२ धावांचे लक्ष्य ठेवले. याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेची २ बाद १०१ अशी धावसंख्या होती. त्यामुळे उर्वरित आठ फलंदाज बाद करून दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यासाठी आता भारताची भिस्त गोलंदाजांवर आहे, तर आफ्रिकेला विजयासाठी १११ धावांची आवश्यकता आह़े

भारताने दिलेल्या २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा सलामीवीर एडीन मार्करमला (१६) मोहम्मद शमीने लवकर बाद केले. मग कर्णधार डीन एल्गर (३०) आणि कीगन पीटरसन (नाबाद ४८) अप्रतिम फलंदाजी करताना दुसऱ्या गडय़ासाठी ७८ धावांची भागीदारी रचली. मात्र, दिवसाच्या अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर जसप्रीत बुमराने एल्गरला बाद करत ही जोडी फोडतानाच भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.

त्याआधी, तिसऱ्या दिवशी २ बाद ५७वरून पुढे खेळणाऱ्या भारताचा दुसरा डाव १९८ धावांत आटोपला. चेतेश्वर पुजारा (९) आणि अजिंक्य रहाणे (१) या अनुभवी फलंदाजांना अनुक्रमे मार्को जॅन्सन आणि कॅगिसो रबाडा यांनी झटपट बाद केले. परंतु कर्णधार विराट कोहली (१४३ चेंडूंत २९) व पंत यांनी पाचव्या गडय़ासाठी ९४ धावांची भागीदारी रचत भारताला सावरले. पंतने चौथे कसोटी शतक नोंदवताना १३९ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक

 भारत (पहिला डाव) : २२३

दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : २१०

भारत (दुसरा डाव) : ६७.३ षटकांत सर्वबाद १९८ (ऋषभ पंत नाबाद १००, विराट कोहली २९; मार्को जॅन्सन ४/३६, लुंगी एन्गिडी ३/२१)

दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : २९.४ षटकांत २ बाद १०१ (कीगन पीटरसन नाबाद ४८, डीन एल्गर ३०; मोहम्मद शमी १/२२)

पुजारा, रहाणेची कारकीर्द धोक्यात?

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे भारताचे अनुभवी कसोटी फलंदाज सातत्याने धावांसाठी झगडत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवर त्यांच्यावर वारंवार टीकेची झोड उठली आहे. समाजमाध्यम आणि माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चावर आम्ही लक्ष देत नसल्याचे भारतीय संघ व्यवस्थापनाने सांगितले. मात्र, दक्षिण आफ्रिकेतील सहापैकी पाच कसोटी डावांत अपयशी ठरल्यानंतर या दोघांची कारकीर्द धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत रहाणेला २२.६६च्या सरासरीने १३६ धावा, तर पुजाराला २०.६६च्या सरासरीने केवळ १२४ धावा करता आल्या. त्यामुळे श्रीलंकेशी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुजारा-रहाणेला वगळून हनुमा विहारी, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्यापैकी दोघांना मधल्या फळीत संधी मिळणे अपेक्षित आहे.

एल्गरला नाबाद ठरवल्याने भारतीय खेळाडू संतप्त

आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील २१व्या षटकात भारताचा ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने एल्गरला पायचीत पकडले. पंच मरे इरॅस्मस यांनी एल्गरला बाद ठरवल्यानंतर त्याने ‘डीआरसी’ची मागणी केली. यात चेंडू अनपेक्षितपणे यष्टींच्या वरून गेला आणि इरॅस्मस यांनाही आश्चर्य वाटले. हे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटल्यावर भारतीय खेळाडूंनीही बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञानावर टीका केली. ‘‘सुपरस्पोर्ट (प्रक्षेपणकर्ते) जिंकण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग शोधून काढा,’’ असे अश्विन म्हणाल्याचे यष्टींमधील माइकमध्ये ऐकू आले. तसेच के. एल. राहुलने ‘‘११ खेळाडू विरुद्ध संपूर्ण देश,’’ असे म्हटले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs south africa test 3 day 3 south africa needs 111 runs to win zws
First published on: 14-01-2022 at 02:52 IST