दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी मालिकेत भारताने तिसऱ्या दिवशी सामन्यावरील पकड अधिक मजबूत केली. २ बाद ९ या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. त्यामुळे ३३५ धावांची आघाडी घेणाऱ्या विराटच्या टीम इंडियाने आफ्रिकेला फॉलो-ऑन दिला.
दुसऱ्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने टाकलेल्या चेंडूवर एक घटना घडली. त्याने टाकलेला चेंडू उसळी घेत आफ्रिकेच्या डीन एल्गरच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर एल्गर जमिनीवर कोसळला. या घटनेमुळे एल्गरला मैदानातून बाहेर जावे लागले. तसेच त्याला सामन्यातूनही माघार घ्यावी लागली. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे मात्र अद्याप समजलेले नाही.
Ooops! Umesh’s bouncer hits Elgar on the Helmet
https://t.co/IC3c3izUpB via @bcci— Viraj B. (@VirajB1) October 21, 2019
दरम्यान, २ बाद ९ या धावसंख्येवरून खेळताना आफ्रिकेने पहिल्या सत्रात ४ तर दुसऱ्या सत्रात ४ गडी गमावले. आफ्रिकेचा कर्णधार पहिल्या डावात अपयशी ठरला. ९ चेंडूत १ धाव काढून तो बाद झाला. उमेश यादवने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ३ बाद १६ अशी झाली होती. त्यानंतर मात्र भारताला गडी बाद करण्यासाठी काही काळ झगडावे लागले.
दुखापतग्रस्त एडन मार्क्रमच्या जागी खेळणारा झुबायर हामझा याने टेम्बा बावुमाच्या साथीने ९१ धावांची भागीदारी केली. हामझाने दमदार अर्धशतक ठोकले. पण ६२ धावांवर तो बाद झाला. त्याने १० चौकार आणि १ षटकार ठोकला. पाठोपाठ ३२ धावा काढून बावुमाही बाद झाला. कसोटी पदार्पण करणारा हेन्रीक क्लासें स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे पहिल्या सत्राच्या शेवटी आफ्रिकेची अवस्था ६ बाद १२९ धावा केल्या. जॉर्ज लिंड (३७) याने काही काळ संघर्ष केला. पण त्याला तळाच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला ३३५ धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावात उमेश यादवने ३ बळी तर मोहम्मद शमी, शाहबाज नदीम व रवींद्र जाडेजाने २-२ बळी टिपले.