चेन्नई : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात एकमेकांसमोर येतील, तेव्हा युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असेल. चेन्नई येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघ पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी देऊ शकेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ जवळपास एका दशकानंतर एकमेकांविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहेत. या सामन्यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने निर्भेळ यश संपादन केले होते. त्यामुळे कसोटी सामन्यातही भारताचे पारडे जड मानले जात आहे. उमा छेत्री, प्रिया पूनिया, सायका इशक, अरुधंती रेड्डी आणि शबनम शकील यांना आपला पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळू शकते.

भारताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक-एक कसोटी सामना खेळला होता आणि दोन्हीत विजय नोंदवला होता. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना २०१४ मध्ये मैसूर येथे खेळला होता. या सामन्यात भारताने एक डाव व ३४ धावांनी विजय नोंदवला.

हेही वाचा >>>IND vs ENG: दणदणीत विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये; अक्षर-कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत केवळ पाच कसोटी सामना खेळले आहेत. सलामीची फलंदाज स्मृती मनधाना भारताची सर्वांत अनुभवी खेळाडू असून तिने हरमनप्रीतपेक्षा एक कसोटी सामना अधिक खेळला आहे. मनधना आणि जेमिमा रॉड्रिग्जने इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमक दाखवली होती. सलामीची फलंदाज शफाली वर्मा आणि अष्टपैलू दीप्ती शर्माकडूनही चांगली कामगिरी अपेक्षित आहे. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना नेहमीच मदत मिळते. त्यामुळे दीप्ती शर्माला स्नेह राणाची चांगली साथ मिळू शकेल.

● वेळ : सकाळी ९.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.