भारत आणि श्रीलंका यांच्यात ५ जानेवारीपासून टी २० मालिका खेळण्यात येणार आहे. श्रीलंकेच्या या भारत दौऱ्याची सुरूवात गुवाहाटीतून होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना ७ जानेवारीला इंदोरला तर तिसरा सामना १० जानेवारीला पुण्यात होणार आहे. या मालिकेतील विशेषकरून ३ महत्त्वाच्या कामगिरीवर लक्ष असणार आहेत. ते खेळाडू म्हणजे…

लोकेश राहुल

लोकेश राहुल सध्या धमाकेदार फॉर्मात आहे. सततच्या अपयशामुळे स्थानिक त्याने काही काळ क्रिकेट सामन्यांत खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचा खेळ बहरला. विशेषत: टी २० सामन्यात त्याने सलामीला येत दमदार कामगिरी करून दाखवली. वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेत शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्यामुळे राहुलला सलामीला येण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोनं करत राहुलने यशस्वी कामगिरी करून दाखवली.

शिखर धवन हा आता तंदुरूस्त असून श्रीलंका विरूद्धच्या मालिकेतून तो पुनरागमन करत आहे. नुकतेच त्याने रणजी क्रिकेट स्पर्धेत शतक ठोकले आहे. त्यामुळे सलामीच्या स्थानासाठी शिखर धवन आणि राहुल यांच्यात स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्याच्या खेळीकडे साऱ्यांचे लक्ष असू शकते.

लसिथ मलिंगा

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा हा टी २० मालिकेत श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. वाढत्या वयाबरोबरच त्याच्या कामगिरीतही सुधारणा होताना दिसते आहे. त्याच्या गोलंजाजीतील वेग कमी झाला असला, तरीही त्याच्या गोलंदाजीतील धार कमी झालेली नाही. नुकतेच न्यूझीलंडविरूद्धच्या टी २० सामन्यात १२५ धावांच्या माफक आव्हानाचा बचाव करताना मलिंगाने दमदार कामगिरी करून दाखवली. दुसऱ्या षटकातच त्याने चार चेंडूत चार बळी टिपण्याचा पराक्रम केला. डावाच्या शेवटच्या टप्प्यात त्याची गोलंदाज अद्यापही चांगली कामगिरी करत आहे. IPL च्या अंतिम सामन्यात त्याने केलेली गोलंदाजी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

भारताविरूद्ध टी २० सामन्यांत मलिंगाने कर्णधार म्हणून या आधी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. २०१४ च्या टी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला पराभूत केले होते, तेव्हा मलिंगा कर्णधार होता. टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेत खेळण्याची इच्छा मलिंगाने व्यक्त केली आहे. त्यामुळे भारताविरूद्धच्या टी २० मालिकेत त्याच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

जसप्रीत बुमराह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तब्बल चार महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये ‘कमबॅक’ करत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर होता. तो तंदुरूस्त झाल्यावरही टी २० विश्वचषक २०२० लक्षात घेता त्याला अतिरिक्त काळ विश्रांती देण्यात आली होती. बुमराहच्या पुनरागमनामुळे भारताला आनंदच होणार आहे. कारण गेल्या काही टी २० सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांचा मारा शेवटच्या टप्प्यात बोथट दिसून आला.

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर दोघेही दुखापतग्रस्त आहेत. अशा वेळी गोलंदाजीचा भार बुमराहवर आहे. अशा परिस्थितीत २६ वर्षीय बुमराह कशाप्रकारे कामगिरी करतो याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.