राजकोट : श्रीलंकेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या निर्णायक तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल. या सामन्यात चमकदार  कामगिरी करायची झाल्यास भारतीय जलदगती गोलंदाज आणि आघाडीच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर भारताला दुसऱ्या सामन्यात १६ धावांनी पराभूूत व्हावे लागले.

गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

युवा वेगवान गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला पराभूत व्हावे लागले. मात्र, उमरान मलिक आणि शिवम मावी यांना अशा परिस्थितीतूनही खूप काही शिकण्यास मिळाले असेल. दुखापतीतून पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने गेल्या सामन्यात आपल्या दोन षटकांत पाच नोबॉल टाकले. पहिल्याच षटकात त्याने तीन नोबॉल टाकत ट्वेन्टी-२० मध्ये नोबॉलची हॅट्ट्रिक करणारा तो भारतीय गोलंदाज बनला. पहिल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मावी आणि अर्शदीप यांच्या नोबॉलचा फटका भारताला बसला. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंडय़ाला फिरकी गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागले. त्यामुळे निर्णायक सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास गोलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल.

फलंदाजांच्या कामगिरीकडे नजर

आघाडीच्या फलंदाजीच्या फळीला पुन्हा एकदा अपयश आले. शुभमन गिलला सलग दुसऱ्यांदा फलंदाजीत यश मिळाले नाही. राहुल त्रिपाठीलाही पहिल्या सामन्यात चमक दाखवता आली नाही. अर्धा संघ ६० धावांच्या आत परतल्यानंतर अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. अक्षरच्या रूपाने भारताला अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. निर्णायक सामन्यात संघात बदल करण्याची शक्यता कमीच आहे.

आशिया चषकविजेत्या श्रीलंकेने गेल्या सामन्यात विजय मिळवत जोरदार पुनरागमन केले. तरीही त्यांच्या मध्यक्रमाकडून चांगल्या खेळीची अपेक्षा संघाला असेल. राजकोटची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक ही या सामन्यात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

* वेळ : साय. ७ वा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)