India W vs Australia W Weather Update: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अनेक महत्वाच्या सामन्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. काही सामने श्रीलंकेत पार पडले. श्रीलंकेतही पावसाने हजेरी लावल्याने सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील निर्णायक सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात पावसामुळे अडथळा निर्माण झाला होता, पण शेवटी भारताने बाजी मारली. साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश सामन्यात ५ वेळा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता. दरम्यान स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यातही हजेरी लावणार का? कसं असेल हवामान? जाणून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये महिला वर्ल्डकप स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. हा सामना देखील नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. बीबीबी वेदरने दिलेल्या वृत्तानुसार, सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता ४० ते ७० टक्के इतकी असणार आहे.

आनंदाची बातमी अशी की, या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर हा सामना ३० ऑक्टोबरला पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. तर उर्वरित खेळ ३१ ऑक्टोबरला खेळवला जाईल. पण जर ३१ ऑक्टोबरला देखील पावसाने हजेरी लावली, तर ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ हा गुणतालिकेत भारतीय संघापेक्षा पुढे आहे.

भारतीय संघाने या स्पर्धेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत दमदार सुरूवात केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाचं सेमीफायनल गाठणं कठीण झालं होतं. पण न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.