आज तिसऱ्या सामन्यात श्रेयस, ऋतुराजला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय

सलग दोन विजयांसह मालिका आधीच खिशात घातलेल्या भारतीय संघाला रविवारी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात प्रयोगाची संधी आहे. या सामन्यात मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर आणि महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांना भारतीय संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने शुक्रवारी झालेला दुसरा ट्वेन्टी-२० सामना आठ धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी प्राप्त केली. हा भारताचा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील शंभरावा विजय ठरला. या कामगिरीनंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत या दुसऱ्या सामन्यातील अर्धशतकवीरांना १० दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे ते रविवारी रंगणाऱ्या अखेरच्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील. त्यांच्या जागी श्रेयस आणि ऋतुराज यांना संधी लाभू शकेल. 

मधल्या फळीचा पेच

 भारताच्या मधल्या फळीत दोन जागा रिक्त आहेत. यापैकी एक जागा श्रेयसला मिळणे अपेक्षित आहे. तसेच इशान किशन यष्टिरक्षणाची धुरा सांभाळणार असला, तरी तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तो पुन्हा सलामीला आल्यास ऋतुराजला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागेल.

आवेश पदार्पणाच्या प्रतीक्षेत

‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात दमदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज आवेश खान अजूनही आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. दीपक चहरला विश्रांती देत आवेश किंवा मोहम्मद सिराजला संधी देण्याचा भारतीय संघ विचार करू शकेल. फिरकीपटू कुलदीप यादवचे संघात पुनरागमन होऊ शकेल.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, यजुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव, हरप्रीत ब्रार.

वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, शाय होप, डॅरेन ब्राव्हो, रॉस्टन चेस, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, कायले मेयर्स, जेसन होल्डर, फॅबियन अ‍ॅलन, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, अकील हुसेन, रोमारियो शेपर्ड, ओडीन स्मिथ, हेडन वॉल्श.

’ वेळ : सायं. ७ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदूी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India west indies twenty20 series opportunity india experiment shreyas ayyar ysh
First published on: 20-02-2022 at 01:21 IST