नवी मुंबई : फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने गुरुवारपासून सुरू झालेल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघावर वर्चस्व गाजवले. चार दिवसीय कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताची ९४ षटकांत ७ बाद ४१० अशी धावसंख्या होती.

नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या कसोटीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजांनी पहिल्याच दिवशी चारशे धावांचा टप्पा ओलांडताना हरमनप्रीतने घेतलेला निर्णय योग्य ठरवला. भारतासाठी शुभा सतीश (७६ चेंडूंत ६९) आणि मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज (९९ चेंडूंत ६८) या पदार्पणवीरांसह यास्तिका भाटिया (८८ चेंडूंत ६६) आणि अनुभवी दीप्ती शर्मा (९५ चेंडूंत नाबाद ६०) यांनी अर्धशतके साकारली.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

भारतीय महिला संघातील खेळाडूंना कसोटी सामने खेळण्याचा फारसा अनुभव नाही. २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या जेमिमाचा हा पहिला कसोटी सामना ठरला. तसेच जवळपास दशकभरापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या कर्णधार हरमनप्रीत आणि उपकर्णधार स्मृती मनधाना यांचा हा अनुक्रमे चौथा आणि पाचवा कसोटी सामना आहे. असे असले तरी भारताच्या फलंदाजांना या प्रारूपाशी जुळवून घेणे फारसे अवघड गेले नाही.

हेही वाचा >>> D vs SA 3rd T20 : सूर्या-कुलदीपच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०६ धावांनी केला पराभव, मालिका सोडवली बरोबरीत

तब्बल नऊ वर्षांनंतर मायदेशात कसोटी सामना खेळणाऱ्या भारतासाठी डावखुऱ्या मनधानाने आक्रमक सुरुवात केली. तिने १२ चेंडूंतच तीन चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या. मात्र, मध्यम गती गोलंदाज लॉरेन बेलने तिला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. तिची सलामीची साथीदार शफाली वर्मा १९ धावा करून बाद झाली. यानंतर शुभा सतीश आणि जेमिमा यांनी भारताचा डाव सावरला. तसेच धावांची गती कमी होणार नाही याचीही दोघींनी काळजी घेतली. त्यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ११५ धावांची भागीदारी रचली. अखेर डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टोनने शुभाला बाद करत ही जोडी फोडली. तसेच जेमिमा लॉरेन बेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली.

या दोघी माघारी परतल्यानंतर हरमनप्रीत (८१ चेंडूंत ४९) आणि यास्तिका भाटिया यांनी भारताचा डाव पुढे नेला. या दोघींनी पाचव्या गडय़ासाठी ११६ धावांची भर घातली. हरमनप्रीतचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले. बॅट क्रीजबाहेर अडकल्याने ती धावचीत झाली. यास्तिकाने मात्र कसोटी कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साकारले. परंतु तिला ६६ धावांवर ऑफ-स्पिनर चार्ली डीनने माघारी पाठवले. मग दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा (७३ चेंडूंत ३०) यांनी सातव्या गडय़ासाठी ८८ धावा जोडल्या. नॅट स्किव्हर-ब्रंटने राणाला बाद केले. दिवसअखेर दीप्ती आणि पूजा वस्त्रकार (नाबाद ४) या फलंदाज खेळपट्टीवर होत्या. भारतीय संघाने पहिल्या दिवशी ६२ चौकार आणि दोन षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ९४ षटकांत ७ बाद ४१० (शुभा सतीश ६९, जेमिमा रॉड्रिग्ज ६८, यास्तिका भाटिया ६६, दीप्ती शर्मा नाबाद ६०; लॉरेन बेल २/६४, नॅट स्किव्हर-ब्रंट १/२५)

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच ४०० धावांचा टप्पा ओलांडणारा भारत हा दुसराच महिला संघ ठरला. यापूर्वी १९३५मध्ये इंग्लंड महिला संघाने न्यूझीलंडविरुद्ध कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद ४३१ धावा केल्या होत्या.